लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सिरम इन्स्टिट्युटमधील इमारतीला लागलेल्या आगीचा समांतर तपास गुन्हे शाखेची ३ पथके करीत आहेत. शुक्रवार (दि. २२)पासून या पथकांनी घटनास्थळावरुन बारकाईने पुरावे गोळा करण्यास सुुरुवात केली आहे. आग लागलेला भाग मोठा असल्याने त्याचा पंचनामा करण्यास वेळ लागत आहे.
औंध येथील रासायनिक प्रयोगशाळेच्या पथकाने शुक्रवारी घटनास्थळावरुन काही पुरावे गोळा केले. त्यांचा व अग्निशमन दलाचा अहवाल आल्यानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले.
‘सिरम’मधील आगीत पाच जणांचा मृत्यु झाला. आग विझविल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. हडपसर पोलिसांच्या हद्दीत ही घटना घडली असली तरी त्याचे महत्व लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेची ३ पथके कामाला लागली आहेत. अनेक ठेकेदारांची कामे ‘सिरम’मध्ये एकाच वेळी चालू होती. त्यामुळे आग नेमकी कोणाच्या चुकीमुळे लागली, याचा तपास करायचा आहे. पंचनामा, रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल, अग्निशमन दलाचा अहवाल आल्यानंतरच आगीचे कारण व त्यात नेमकी चूक कोणाची होती, यावर प्रकाश पडणार आहे. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकेल, असे मोराळे यांनी सांगितले.
चौकट
पाच मृत्यू गुदमरुन, भाजून
‘सिरम’मधील आगीत मृत्यू पावलेल्या पाच जणांचे गुरुवारी (दि. २१) मध्यरात्री शवविच्छेदन करण्यात आले. त्यानुसार या पाचही जणांचे मृत्यू भाजल्याने आणि गुदमरल्याने झाल्याचे म्हटले आहे. अधिक तपासासाठी त्यांचा व्हिसेरा राखून ठेवला असून पृथ्थ:करणासाठी ते रासायनिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
चौकट
पंचनामा आणि जबाब
“सध्या पंचनामा केला जात आहे. सुमारे ६ हजार स्क्वेअर फुट परिसरातील साहित्य, यंत्रसामुग्री आगीत जळून खाक झाली आहे. आग लागली असताना तेथे उपस्थित कामगारांचे जबाब नोंदविले जात आहेत,” असे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.