पुणे : शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचे पूजा चव्हाण प्रकरणात नाव चर्चेत आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यात ते जवळपास १५ दिवस समोर न आल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. यावरून भाजपने राज्य सरकार व शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती. आता शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी देखील पूजा चव्हाण प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
पुण्यात विनायक मेटे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मेटे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेचे विचार उद्धव यांनी बाजूला ठेवले आहे.बाळासाहेब ठाकरेंनी आरोप झालेल्या मंत्र्यांना तासभरही पदावर ठेवले नसते. उद्धव ठाकरेंना नेमकी कोणती मजबुरी आहे? सगळ्या जगाला माहिती आहे, कोण बोलतोय, कोणत्या भाषेत बोलतोय, याचा अर्थ सरकारला नीतिमत्ता राहिलेली नाही.
पूजाची हत्या की आत्महत्या हे चौकशीत समोर येईल. पण पोलीस ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहेत. त्यांच्या चौकशीवर माझा विश्वास नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्वतःहून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी द्यावे असेही मेटे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच धनंजय मुंडे त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर स्वतःहून पुढे आले. ते १५ दिवस लपून बसले नाही.
मराठा आरक्षणाचा निकाल येईपर्यंत शासकीय भरती आणि एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलाव्यात. केवळ दीड महिने म्हणजे १ एप्रिलपर्यंत पुढे घ्याव्यात. राजेश टोपे यांच्या विभागाची भरती उद्या होत आहे.मात्र आरोग्य विभागाची परीक्षा टोपे यांनी पुढे ढकलावी.
आघाडी सरकारला मराठा मुलामुलींचे आयुष्य उध्वस्त झाले तरी देणं घेणं नाही, अशोक चव्हाणांना तर त्याहून नाही. मराठा मुलामुलींचे वैरी मराठा मंत्री झाले आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही, भरती पुढे घ्या. - विनायक मेटे, आमदार