आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 12:28 PM2024-09-23T12:28:44+5:302024-09-23T12:30:50+5:30
शेतकऱ्यांकडून दुधाचे अनुदान न मिळाल्याची तक्रार येताच अजित पवार यांनी सोनाई दूधसंघाला इशारा दिला आणि नंतर त्यावर स्पष्टीकरणही दिलं.
NCP Ajit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी आणि जाहीर सभांमधून केल्या जाणाऱ्या टोलेबाजीसाठी ओळखले जातात. राष्ट्रवादीच्या नुकत्याच झालेल्या जनसन्मान रॅलीतील एका भाषणादरम्यानही अजित पवारांच्या याच शैलीचा प्रत्यय आला. सभेतील शेतकऱ्यांकडून दुधाचे अनुदान न मिळाल्याची तक्रार येताच अजित पवार यांनी सोनाई दूधसंघाला इशारा दिला आणि नंतर त्यावर स्पष्टीकरणही दिलं.
"मला आत्ता चिठ्ठी आली, की जानेवारीपासून दुधाचं अनुदान मिळालेलं नाही. मला त्याबाबात सविस्तर माहिती द्या. तिथं जे अधिकारी होते त्यांची मधल्या काळात बदली झाली असून तिथं नवीन अधिकारी आले आहेत. आम्ही जे अनुदान जाहीर केलंय ते द्यायचं कोणाचंही ठेवणार नाही," असा शब्द अजित पवार यांनी दूध उत्पादकांना दिला. त्यावेळी गर्दीतून एका शेतकऱ्याने सोनाई दूधसंघाची तक्रार केली. त्यावर अजित पवारांनी म्हटलं की, "सोनाईकडे पण बघतो ना, कसं त्यांनी दिलं नाही ते. म्हणजे पैसे का दिले नाहीत ते बघतो. नाहीतर तुम्ही म्हणाल दादा तर दमच द्यायला लागला. दम नाही बाबा आमचा नमस्कार आहे," असं म्हणत अजित पवारांनी हात जोडले आणि उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.
दरम्यान, सोनाई दूधसंघाचे प्रमुख असलेले यशवंत माने आणि त्यांचे चिरंजीव प्रवीण माने यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेत त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. तसंच प्रवीण माने हे इंदापूरमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासही इच्छुक आहेत.
दुधाच्या अनुदानाबाबत काय आहे सरकारचा निर्णय?
दुधाचे दर कमी झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारने दुधाला प्रतिलीटर ५ रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी दुधाला प्रतिलिटर ३० रुपये स्थायीभाव आणि शासनाकडून ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.