आज वीकेंड लॉकडाऊन संपल्यानंतर शहरात ठिकठिकाणी गर्दी उसळली. सकाळी सकाळीच मार्केट यार्डमधील वाहनांच्या गर्दीचे फोटो सोशल मीडियावर आले. त्यामुळे पुण्याला येत्या काळात पुन्हा कोरोनाचा विळखा बसणार हेच समोर येत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात नेहमीप्रमाणे वाहतूककोंडी झाली. पाषाण, औंध आणि बाणेरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठी वर्दळ होती. रविवारी लॉकडाऊन होता म्हणून सगळा परिसर निर्मनुष्य होता आणि आज अचानक लोकं रस्त्यावर उतरली होती.
सेनापती बापट रोडवरही सकाळी सकाळी नोकरीला जाणारे नोकरदार बाहेर पडले.
दुपारी ज्ञानेश्वर पादुका चौक आणि दीप बंगला चौकात तर गर्दीने उच्चांकच मोडला होता. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. त्यातून सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडालेला पहायला मिळाला.
परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कडक लॉकडाऊनचे संकेत दिले होते, कदाचित त्याची आज पुन्हा गरज आहे. कितीही कठोर टीका झाली तरी सध्या कडक उपाययोजनांची आवश्यकता आहे. कोरोनाची चेन वेळीच तोडता आली नाही तर त्याचा उद्रेक अटळ आहे!