नारायणगाव : टोमॅटोने केले मालामाल तर कोथिंबीर आणि मेथीने केले शेतकऱ्यांचे हाल, कोथंबीर आणि मेथीची अचानक आवक वाढल्याने आणि त्यातच पावसामुळे मागणी घटल्याने कोथिंबीर जोडी ५० पैसे तर मेथीची जुडी १ रुपया दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांना आली. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात पडलेल्या ५० ते ६० हजार कोथिंबीर आणि मेथीच्या जुड्या फेकून देण्यात आल्या.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात शनिवारी ( दि. २९ ) कोथिंबीर, मेथी आणि शेपूची एकूण ३ लाख २५ हजार १०० जुडींची आवक झाली. यामध्ये कोथिंबीरची १ लाख ४९ हजार १०० जुडीची आवक होऊन कोथिंबीरच्या शेकडा जुडीला ५१ रुपये ते १८०१ रुपये, मेथीची १ लाख ६२ हजार ६०० जुडीची आवक झाली. मेथीला शेकडा बाजारभाव १०१ ते ९०१ रुपये बाजारभाव मिळाला तर शेपू ची १३ हजार ४०० जुडींची आवक झाली. शेपूला शेकडा जुडी ३०१ ते १२०१ रुपये बाजारभाव मिळाला.
नारायणगाव उपबाजार केंद्रात एकूण ३ लाख २५ हजार १०० जुडींची जादा प्रमाणात आवक झाली. व्यापाऱ्यांनी कोथिंबीर, मेथी आणि शेपूची खरेदी केली. मात्र भाजीपाल्याचा मोठा खरेदीदार असलेल्या मुंबई मध्ये सततदार पाऊस असल्याने भाजीपाल्याची मागणी कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली. व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केल्याने बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी विक्री साठी आलेले कोथिंबीर आणि मेथी बाजार समिती आवारातच फेकून दिली.