पुणे : एकाच कंपनीत काम करीत असताना दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. ते दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्या प्रेमसंबंधातून जन्माला आलेल्या बाळाला आश्रमात ठेवतो, असे सांगून तेरा दिवसांच्या बाळाला तो घेऊन गेला. मात्र, बाळाच्या जिवाचे बरे वाईट केल्याचा तिचा संशय असल्याने तिने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
शुभम महेश भांडे ( वय २३ रा. स.नं. ४८/३, गणेशनगर गल्ली नं. ४ वडगाव शेरी) आणि योगेश सुरेश काळे (वय २६ रा. स.नं. १४३ मारुती निवास धावटेवस्ती, मांजरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. आरोपी शुभम आणि फिर्यादी दोघे २०१७ मध्ये खराडीच्या एका कंपनीत कामाला होते. एकत्र काम करीत असल्याने दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असताना २०१८ ला ती गर्भवती राहिली. तिने २०१९ मध्ये बाळाला जन्म झाला. आरोपी शुभम याने तिला आपल्या आयुष्याचा विचार कर. आपण बाळाला आश्रमात ठेवू असे म्हणाला आणि तो बाळाला घेऊन गेला. ती वेळोवेळी विचारायची तेव्हा तो आश्रमात ठेवले म्हणायचा. पण तिला त्याचा संशय आल्याने तिने पहिल्यांदा चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला होता. या घटनेला अडीच वर्षे झाली आहेत. आरोपी योगेश काळे हा शुभमचा मित्र होता. बाळ आश्रमात नेताना तो शुभमच्या बरोबर होता. दोन्ही आरोपींना अटक केली करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याचे मुंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे यांनी सांगितले.
............................