पुणे : प्रभाग एकच; पण त्यातील एका भागासाठी थेट १०० कोटी रुपयांची तरतूद, तर त्याच प्रभागातील दुसऱ्या भागाला फक्त ३ कोटी रुपये. महापालिकेच्या सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात प्रभाग क्रमांक ६७ अ व ब च्या संदर्भात असा भेदभाव करण्यात आला आहे.एकाच प्रभागाची अ व ब अशी विभागणी फक्त महिलांना प्रतिनिधित्व द्यायचे म्हणून करण्यात आली आहे; मात्र त्यात हा माझा भाग व हा दुसऱ्याचा भाग, अशी विभागणी करून घेतल्यामुळे हा प्रकार घडला आहे. प्रभाग अ स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम यांचा आहे, तर प्रभाग ब मधून माजी उपमहापौर आबा बागूल निवडून आले आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्ष म्हणून अंदाजपत्रक तयार करण्याचे सर्व अधिकार कदम यांच्याकडे होते. त्यांनी अ साठी १०० कोटी रुपयांची व ब साठी फक्त ३ कोटी रूपयांची तरतूद करून आर्थिक अन्याय केला असल्याची टीका बागूल यांनी केली आहे. (प्रतिनिधी)मुळात एकाच प्रभागाची अशी मोडतोड करणेच चुकीचे आहे; मात्र स्थायीच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी जादा तरतूद घेणे स्वाभाविक आहे; पण ती एकपट, दुप्पटपर्यंत ठिक आहे. त्यांनी एकदम ३२ पट तरतूद करून घेतली आहे. रचनात्मक असे एकही काम त्यांनी दाखवलेले नाही. बहुतेक तरतूद रस्ते, गटारी, काँक्रिटीकरण यासाठीच दाखवली आहे. हा करदात्या नागरिकांच्या पैशांचा निव्वळ अपव्यय आहे. आयुक्तांनी सुचवलेल्या सर्व चांगल्या योजनांमध्ये त्यांनी ३० टक्के कपात सुचवली आहेच; शिवाय स्वत:च्याच प्रभागातील राजीव गांधी ई-लर्निंग या शाळेच्या तरतुदीमध्ये देखील कपात केली आहे. त्यांच्याही परिसरातील काही कुटुंबांची मुले या शाळेत असणे शक्य आहे, त्यांच्यावरच त्यांनी हा अन्याय केला आहे.- आबा बागूल
निधी वाटपात का हा दुजाभाव?
By admin | Published: March 04, 2016 12:44 AM