पुणे : सरकार आमदार, खासदारांना भरघोस निधी देते, मग वाचनालयांबाबत उदासिनता का? गेल्या तीन वर्षात साडेबारा हजारांपैकी पाच हजार ग्रंथालये बंद केली. तीन वर्षांपासून सहा हजार ग्रंथालयांना किरकोळ कारणांवरुन अनुदान मिळालेले नाही. ग्रंथालयांसाठी शासनाकडे पैसे नाहीत, ही पुरोगामी महाराष्ट्राची शोकांतिका आहे. न्यायालयाने फटकारले असूनही तीन वर्षे मठ्ठपणे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या वाड.मयीन संस्कृतीचे काय होणार, असा सवाल ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर यांनी उपस्थित केला. शासनाकडे इतर कामांसाठी पैैसे आहेत, मात्र ग्रंथालयांसाठी नाहीत. ग्रंथालयांची ही अवस्था पाहून अस्वस्थता येते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
एसएनडीटी पदव्युत्तर मराठी विभाग आणि समकालीन प्रकाशनाच्या वतीने चंद्रकांत पाटील आणि केशव तुपे संपादित ‘लोचना आणि आलोचना’ या पुस्तकाविषयी मुक्त संवाद आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर आणि लेखक-समीक्षक रेखा इनामदार-साने, मराठी विभागप्रमुख प्रताप गायकवाड, चंद्रकात पाटील, सुहास कुलकर्णी आदी उपस्थित होते.
महानोर म्हणाले, ‘घरोघरी टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटरसाठी जागा आहे, मात्र पुस्तकांसाठी कोनाडा नाही. नातेसंबंध, अर्थकारणाप्रमाणे सामान्यांच्या आयुष्यात ज्ञानप्रक्रियेलाही जागा व्हायला हवी. ज्ञानाच्या प्रक्रियेतून जगण्याला अर्थ प्राप्त होतो. साहित्य संमेलनाला २५,००० लोक येतात. त्यापैैकी १०,००० लोक १० पुस्तकेही खरेदी करत नाहीत. अशी परिस्थिती असेल तर वाचनसंस्कृती वृध्दिंगत कशी होणार? पुरोगामी महाराष्ट्रात हा विचार का रुजत नाही? पुस्तके घरात विराजमान का होत नाहीत? वाचकच उरलेला नाही, तरुणांचे काय करायचे, ते समजत नाही. साहित्यानेच समाज, राष्ट्राची उभारणी झाली आहे. साहित्यिक, वाचक, विद्यार्थी पुन्हा जागे होतील आणि वैैचारिक वाड.मय नव्याने निर्माण होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.’
इनामदार-साने म्हणाल्या, ‘श्याम मनोहर आपल्या लेखनातून वाचकांसमोर आव्हाने निर्माण करतात. अज्ञाताच्या शोधासाठी कोणती अभ्यासपद्धती अवलंबता येईल, याचा अंदाज येतो. भावना आणि बौद्धिकता, व्यक्ती आणि व्यवस्था, धर्म आणि धर्मनिरपेक्षता यांचा मिलाप या दिशादर्शक साहित्यात पहायला मिळतो. साहित्य व्यवहारातील चांगल्या गोष्टींचा आवर्जून उल्लेख करायला हवा. कथानक हा साहित्याचा गाभा असतो. एका आशयसूत्राला अनेक धाग्यांनी घातलेली वीण सशक्त लेखनात पहायला मिळते. उत्स्फूर्तता हे आश्वासक समीक्षेचे द्योतक आहे. याउलट, आस्वादन समीक्षेने लेखक अनेकदा भारावून जातात.’यावेळी महानोर यांनी संपादित केलेल्या ‘गपसप’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. डॉ. प्रताप गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. आनंद अवधानी यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले. नागनाथ बळते यांनी सूत्रसंचालन केले.
कुसुमाग्रजांची कविता वा.चो.देशपांडे यांच्या नावाने
मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकामध्ये कुसुमाग्रजांची कविता वा.चो.देशपांडे यांच्या नावाने छापण्यात आली. ते पाहून धक्का बसला, याबाबत विचारणा केली असता शासनाने नियुक्त केलेल्या सात साहित्यिकांच्या संपादक मंडळाने ते पुस्तक तपासल्याची माहिती मिळाली. त्याबाबत विचारणा केली असता, एका बार्इंनी ‘तुम्ही आमदार आहात, तुमहाला काय कळते’ असे विचारले असता ‘अहो, मी आधी कवी आहे’, असे दुर्देवाने सांगावे लागल्याचा किस्सा महानोर यांनी सांगितला.