लोकमत न्यूज नेटवर्कसोमेश्वरनगर : प्रभागांची रचना वाणेवाडी गावाची.. नकाशा वाघळवाडी गावाचा.. तर प्रभागरचनेवर चर्चा मुरूम गावाची. नक्की या ग्रामसभेत काय चालले आहे, हे ग्रामस्थांनाच समजेना. अखेर ग्रामसभेचा त्याग करून ग्रामस्थांनी निघून जाणेच पसंत केले. शासकीय अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे वाणेवाडी ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिल्याने ग्रामस्थ वैतागून निघून गेले. गावकामगार तलाठी ए. डी. होळकर, ग्रामसेवक डी. जी. बालगुडे आणि बारामतीचे विस्तार अधिकारी ए. के.खांडेकर या अधिकाऱ्यांना वाणेवाडी गावाच्या प्रभागनिहाय रचनेची कसलीही माहिती नसल्याने ग्रामस्थांनी नंतर बैठक बोलावण्याची मागणी केली. परंतु त्ताला कुणाचाही प्रतिसाद मिळाला नाही.ग्रामसभेत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्यसंख्या वाढविण्याची मागणी केली; परंतु गावाची लोकसंख्या कमी असल्याने सदस्यसंख्या वाढवता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.बैठकीला सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संचालक किशोर भोसले, पोपटराव भोसले, दिग्विजय जगताप, बाळासाहेब जगताप, विक्रम भोसले, उद्योजक राजेंद्र जगताप, सरपंच उषा चौगुले, उपसरपंच ललिता चव्हाण सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांसह ग्रामस्थांनी ग्रामसभेतून निघून जाणेच पसंत केले.
वाणेवाडीच्या ग्रामसभेमध्ये चाललंय तरी काय?
By admin | Published: June 29, 2017 3:32 AM