पुणे : आम्हीसुद्धा इथे येणाऱ्या गिऱ्हाईकांना नाही म्हणू शकतो. तो अधिकार आम्हाला आहे. असं असताना मणिपूरच्या महिलांसोबत जे घडले हे खूप चुकीचे आहे. आम्ही त्यांच्या वेदना समजतो. मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. म्हणून आम्ही इथे एकत्र आलो आहोत, असे मत बुधवार पेठ येथे सेक्सवर्क करणाऱ्या महिलांनी व्यक्त केले.
मणिपुरातील हिंसाचार आणि दोन महिलांना विवस्त्र करून धिंड काढण्याच्या घटनेचे पडसाद शहरात निषेध व निदर्शनाच्या स्वरूपात उमटले आहेत. घडलेल्या घटनेचा निषेध विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, महाविद्यालयीन विद्यार्थी याचबरोबर सेक्स वर्क करणाऱ्या महिलांकडून करण्यात आला.
वारंवार घडणाऱ्या अशा घटना थांबल्या पाहिजेत. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. तसेच देशात महिला सुरक्षित राहाव्यात, यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. मणिपूरमध्ये झालेल्या घटनेत जे दोषी आहेत त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे व त्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे, असेही मत यावेळी सेक्स वर्क करणाऱ्या महिलांकडून व्यक्त करण्यात आले.