बारामती : काय ते कृषि प्रदर्शन आणि काय ते राजेंद्र पवार यांचे नियोजन, माझा शेतकरी एकदम ओक्के या शब्दात आमदार शहाजीबापू शिंदे यांनी त्यांच्या खास शैलीत कृषी प्रदर्शनाचे वर्णन केले. अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या समवेत प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत पत्रकारांशी गप्पा मारल्या. आमदार पाटिल यांनी " गुवाहाटीफेम " डायलॉग च्या पार्श्वभुमीवर प्रदर्शनाच केलेलं वर्णन केले. त्याला उपस्थितांनी दाद दिली. पाटील बारामतीला पहिल्यांदा १९७१ ला आले होते .यावेळेच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. पाटील म्हणाले, पंढरपूरचे आमदार औंदुबर पाटील हे आमचे नातेवाईक. मी तेथे हायस्कूलला शिकत असताना त्यांनी मला चल येतो का बारामतीला, असे म्हटल्यावर मी बारामतीत आलो. त्यावेळी मी पहिल्यांदा ज्येष्ठ नेते शरद पवार, पद्मश्री अप्पासाहेब पवार यांना पाहिले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणाने सातत्याने बारामतीशी संपर्क येत गेला. मी काॅंग्रेस चळवळीत पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. २०१३ ला शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख व पवार यांची आघाडी झाल्यावर मला शिवसेनेकडे जाण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. परंतु तिकडे गेलो तरी माझी व पवार कुटुंबियांची कधीही कटूता आली नाही, येणार नसल्याचे पाटील म्हणाले. हे प्रदर्शन पाहिल्यावर साधारणपणे दूधाच्या संदर्भाने येथील काम पाहून सांगोल्यात चांगले काम करता येईल. फळबागा, तरकारीच्या बाबतीत आमच्या तालुक्याला आकर्षण आहे. त्यासाठी राजेंद्र पवार यांचे मार्गदर्शन घेऊन सांगोल्यात शेतीचे चांगले प्रयोग राबवू शकतो.
तोपर्यंत सगळ्यांनी स्वप्ने बघायची
मंत्रीमंडळात समावेश होईल का या प्रश्नावर शहाजीबापू पाटील म्हणाले, यादी जाहीर होऊन मुख्यमंत्री कार्यालयाचा फोन येत नाही. तोपर्यंत सगळ्यांनी स्वप्ने बघायची असतात. स्वप्ने बघायला कोणाचे बंधन नसते, त्याला पैसे लागत नाही. ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळणार आहे, ज्याला मिळणार नाही, त्याने राबून काम करत राहायचं. पक्षाशी प्रामाणिक राहायचं. बारामतीत राजकीय बैठकीला बोलावले तर मला यावे लागणार ,दादा खवळले तरी काय करणार. अहो पक्षाने सांगितल्यावर यावं लागत. नाही तर पक्षातून काढून टाकतील की, असे देखील पाटील म्हणाले.