Pune: क्या चल रहा है? स्थानिक कार्यकर्त्यांना विचारणा, असे हे दिलदार स्वभावाचे राजीव गांधी
By राजू इनामदार | Published: November 8, 2024 04:21 PM2024-11-08T16:21:27+5:302024-11-08T16:22:39+5:30
राजीव गांधींना भेटता यावे, त्यांच्याबरोबर बोलता यावे, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा त्याकाळी शरद पवारांनी पूर्ण केली
पुणे: निवडणुकीला मोठा केंद्रीय स्तरावरचा नेता येणे, त्याची सभा होणे याचे निवडणुकीत दिवसरात्र राबणाऱ्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांना फार मोठे अप्रुप असते. त्यातही राजीव गांधी सारखा लोकप्रिय नेता असेल तर गोष्टच वेगळी. राजीव गांधी त्यांच्या काळातील जगातील सर्वाधिक देखण्या राष्ट्रप्रमुखांपैकी पहिल्या क्रमाकांवर होते. सन १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत ते प्रचारासाठी पुण्यात आले होते. एस.पी. कॉलेज मैदानात त्यांची जंगी सभा झाली.
स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या सभेची दोनतीन दिवस आधीपासून तयारी करत होते. राजीव गांधींना थोडा वेळ तरी भेटता यावे, त्यांच्याबरोबर बोलता यावे, त्यांनी काहीतरी विचारावे अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र त्यांच्या भोवतीचा सुरक्षा रक्षकांचा गराडा होता. राज्य व केंद्रीय स्तरावरील नेते त्यांच्या अगदी जवळ होते. त्यामुळे या स्थानिकांना विचारणार तरी कोण?
पण ही विचारणा शरद पवार यांनी केली. त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना काय पाहिजे ते बरोबर ओळखले. राजीव गांधी स्टेजजवळ उभे असतानाच त्यांनी एकदोन जणांना हात केला. सुरक्षा रक्षकांचे कडे मोडून लगेचच सगळे आत आले. युवक काँग्रेसचे तत्कालीन पदाधिकारी संजय बालगुडे यांनी त्यातही प्रसंगावधान राखत बरोबर एक हार घेतला. राजीव गांधी यांच्या जवळ गेल्यानंतर लगेचच त्यांनी तो हार त्यांच्या गळ्यात घातला. त्यांनीही तो स्विकारला. तोपर्यंत बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे चिरंजीव अनंत गाडगीळ, शांतीलाल सुरतवाला, वसंत चव्हाण हे पदाधिकारीही तिथे जमा झाले. शरद पवार यांनी सर्वांची नावे घेत राजीव गांधी यांच्याबरोबर ओळख करून दिली. उमद्या स्वभावाच्या राजीव यांनीही सर्वांना नमस्कार केला. क्या चल रहा है? म्हणून विचारणा केली. काही प्रश्न विचारले. निघण्याची घाई असतानाही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नाराज न करण्याच्या त्यांच्या या दिलदार स्वभावाचे बालगुडे यांच्यासह सर्वांनाच अजूनही स्मरण आहे.