बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची वृत्त पसरल्यानंतर देखील बारामतीत सन्नाटाच पसरल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्याने पक्षाच्या माहेरघरी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजित पवार हे भाजपमध्ये जाणार, अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या बातम्यांनी एप्रिल महिन्यातच जोर धरला होता. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची भुमिका घेतली. त्यानंतर अजित पवार यांच्याबाबत होणारी चर्चा थांबली होती.
त्यानंतर अजित पवार यांनी थेट मागील महिन्यात विरोधी पक्षनेते पदावरुन मुक्त करण्याची मागणी केली. मला पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी पद देण्याची मागणी केली होती. त्यानंतर थेट आज अजित पवार यांच्यासह पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार बाहेर पडल्याचे वृत्त बाहेर आले. अजित पवार यांच्यासमवेत नेमक्या किती आमदारांचा गट बाहेर पडला, तसेच अजितदादा नेमक्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यास बारामतीच्या राजकारणात मोठे फेरबदल होणार आहेत. कारण सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादीसाठी सबकुछ ‘अजितदादा’ आहेत. पक्षावर त्यांचीच एकहाती पकड आहे.