पुणे: शहरात लुटमारीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. चोरट्यांनी तीन वेगवेगळ्या घटनेत तिघांना धमकावून १ लाख ६२ हजार ८०० रुपयांना लुटल्याची घटना उघडकीस आली. वारजे, शिवाजीनगर, तसेच कोंढव्यातील उंड्री परिसरात या घटना घडल्या.
शिवाजीनगर भागातील नाना-नानी पार्कजवळ सार्वजनिक स्वच्छतागृहात तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील सोनसाखळी आणि रोकड, असा ऐवज लुटून नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार तरुण मंगळवारी (दि. ११) मध्यरात्री शिवाजीनगर भागातून निघाला होता. नाना-नानी पार्कजवळील स्वच्छतागृहात तो गेला. त्या वेळी एका चोरट्याने त्याला धमकावून गळ्यातील ३२ हजार रुपयांची सोनसाखळी काढून घेतली. त्याला मारहाण करून १२०० रुपये ऑनलाइन पद्धतीने पाठवण्यास भाग पाडले. तरुणाला जिवे मारण्याची धमकी देऊन चोरटा पसार झाला. पोलिस उपनिरीक्षक माटे पुढील तपास करत आहेत.
वारजे भागात एका ज्येष्ठ नागरिकाला धमकावून त्यांच्याकडील नऊ हजार ६०० रुपयांची रोकड लुटण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार वारजे भागातील गितांजली काॅलनीत राहायला आहेत. सोमवारी (दि. १०) रात्री साडेआठच्या सुमारास ते मंदिरात गेले होते. देवदर्शन करुन ते दुचाकीवरून वारजे भागातून निघाले होते. कावेरी हाॅटेलजवळील गल्लीत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवले. आम्हाला शिवी का दिली, अशी विचारणा करून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना धमकावून त्यांच्या खिशातील नऊ हजार ६०० रुपयांची रोकड लुटली. पोलिस निरीक्षक अर्जुन नाईकवाडे पुढील तपास करत आहेत.
हडपसरमधील काळेपडळ परिसरात दुचाकीस्वार तरुणाला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील दुचाकी चोरून नेली. चोरट्यांनी तरुणाकडील मोबाइल देखील चोरून नेला. याबाबत एका तरुणाने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे पुढील तपास करत आहेत.