- पौराेहित्य करणारी ही आमची तिसरी पिढी आहे. वडिलांनी ३० वर्षे, तर आजोबांनी १५ ते २० वर्षे पौरोहित्य केले. गेली ६० वर्षे मी पौराेहित्य करीत आहे. लोकशाहीत पंतप्रधान राजा आहे. आणि राजाला पूजा सांगायला मिळते, यापेक्षा मोठं भाग्य कोणते. गणपतीच्या कृपेनेच मला हा मान मिळाला असावा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूजेला बसण्यापूर्वी माझ्याविषयी त्यांना संपूर्ण माहिती दिली. आमच्या तीन पिढ्या पौराेहित्य करीत असल्याचे सांगितले. पूजेच्या वेळी दिलेल्या सूचनांचे ते तंतोतंत पालन करीत होते. ‘देश विश्वगुरू व्हावा, चंद्रयान चंद्रावर सुखरूप उतरू दे’ असा संकल्प त्यांनी सोडला. गणरायाची पंचामृताने पूजा करून जलाभिषेक, धूप, नैवेद्य दाखवून अभिषेक करण्यात आला. संपूर्ण पूजेत ते एकरूप झाले होते. लक्ष विचलित न करता पूजा सांगत असताना दिलेल्या सूचनांनुसार ते प्रतिक्रिया देत होते. अभिषेकानंतर पंतप्रधानांच्या हस्ते आरती करण्यात आली.
पंतप्रधानांना मंत्र पाठ
मी पूजा सांगत होतो. त्यामुळे पंतप्रधान देखील पूजा सांगताना मी दिलेल्या सूचनांचे पालन करीत मंत्र पुटपुटत होते. कदाचित, मी सांगत असलेले बहुतांश मंत्र हे पंतप्रधानांना पाठ असावेत, असे मला वाटले. पंतप्रधानांच्या व्यक्तिमत्त्वाने मला खूपच प्रभावित केले. संपूर्ण पूजेत मला जाणवले ते पंतप्रधानांचे व्यक्तिमत्त्व सकारात्मक, स्थितप्रज्ञ आणि अद्वितीय आहे.
ऐकून घेण्याची भूमिका अधिक
पंतप्रधान सव्वाअकराच्या सुमारास मंदिरात आले. साधारण पावणेबाराच्या सुमारास पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. ते मंदिरात होते तेव्हा त्यांनी मंदिराच्या संरक्षक भिंतीवर लावलेल्या सामाजिक उपक्रमांविषयी विश्वस्तांकडून माहिती घेतली. अभिषेक आणि त्यानंतर पंतप्रधानांनी घेतलेली माहिती पाहून पंतप्रधान हे बोलण्यापेक्षा समोरचा काय बोलतो आहे, ते ऐकून घेण्याच्या भूमिकेत अधिक होते, असे मला जाणवले. (शब्दांकन : रोशन मोरे)