पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाची वेळ नक्की कोणती? याबाबत गूढ आहे. त्याबाबतचा कोणताच वैद्यकीय पुरावा रेकॉर्डवर नाही, असा दावा बचाव पक्षाने बुधवारी (दि. २७) न्यायालयात केला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याची सुनावणी न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू आहे. बचाव पक्षाचे वकील ॲड. सुवर्णा आव्हाड यांनी बुधवारी अंतिम युक्तिवाद केला. यात बचाव पक्षाने सीबीआय तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संजय साडविलकर याने तपास अधिकारी सिंग यांना १९८८ ते १९९३ दरम्यान पिस्तूल विक्रीचा बेकायदेशीर व्यवसाय करायचो, असे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात न्यायालयात त्याने सांगितले की, मी सीबीआयला असे काहीच सांगितले नाही. साडविलकर आणि सिंग यांच्या बोलण्यात तफावत आहे. सीबीआयला आपण खोटे आरोपी घेतले हे माहिती आहे म्हणूनच त्यांनी योग्यप्रकारे (घराची झडती, बँक व्यवहार तपासले नाही) तपास केला नाही, असा दावा बचाव पक्षाने केला.
संजीव पुनोळकर यांच्या लॅपटॉपमधील पत्र सीबीआयने जप्त केले. या पत्रातून पुनोळकर दाभोलकर यांचा किती द्वेष करायचे हे दिसते, असे सीबीआय म्हणते; पण त्या पत्राचा मथळा ‘आव्हान नव्हे निमंत्रण’ असा होता. तुम्ही ध्वनिप्रदूषणाबाबत बोलता ते ठीक आहे; पण मशिदीमधील भोंग्याच्या आवाजातून पण प्रदूषण होते. यावर पण आवाज उठविला पाहिजे. आपण मिळून या विषयात हात घालू, आम्ही कायदेशीर बाजू बघू. यात धमकीचा सूर नाही, याकडे बचाव पक्षाने न्यायालयाचे लक्ष वेधले. पुढील सुनावणी दि. ८ एप्रिल रोजी होणार आहे. सरकारी वकील रिजॉइंडरवर बोलणार आहेत.