पुणे : देशभरात ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गाजत आहे. अनेक ठिकाणी या सिनेमासाठी हाऊसफुलचे बोर्ड लागत आहेत. तर काही ठिकाणी सिनेमा प्रदर्शित करण्यावरून वाद निर्माण होत आहे. काश्मीरातील पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा सिनेमा प्रेरित आहे. बहुतांश भाजपा शासित राज्यांमध्ये द काश्मीर फाइल्स सिनेमा टॅक्स फ्री करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही द काश्मीर फाइल्स करमुक्त करावा अशी मागणी पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
मग महाराष्ट्रात अडचण काय ?
‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश, कनार्टक, त्रिपुरा, गोवा आणि आता उत्तरप्रदेश सरकारने करमुक्त केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारकडे मागणी करुनही अद्याप निर्णय घेतला जात नाही. अडचण काय आहे? असा सवाल त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली प्रतिक्रिया ''द काश्मीर फाइल्ससारखे सिनेमे बनायला हवेत. अशा सिनेमातून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणलं जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायेत ते आज विरोध करत आहेत असा टोला त्यांनी काँग्रेसला नाव न घेता लगावला''
हा चित्रपट टॅक्स फ्री करावा - नितेश राणे
जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लीम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे चित्रण करणारा द काश्मीर फाइल्स हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करावा. ज्यामुळे जम्मू काश्मीरमधील हिंदू समाजावर मुस्लीम दहशतवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले याचे योग्य आणि खरे चित्रिकरण प्रथमच एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून या देशातील जनतेला पाहता येईल. द काश्मीर फाइल्स हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेने अधिकाधिक पाहता यावा याकरिता हा चित्रपट लवकरात लवकर टॅक्स फ्री करावा, ही विनंती, असे पत्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिले आहे.