पिंपरी : बागेश्वर धामाचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी संत तुकाराम महाराज यांच्यावर टीका केली होती. त्या बागेश्वर महाराजांना देहूतील मंदिरात पायघड्या घातल्या. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणो काठी... यानुसार नाठाळावर प्रहार केला. संत सूर्यावर टीका करणाऱ्या शास्त्री महाराजांना संत तुकाराम महाराजांच्या भूमीतच पायघड्या घेतल्या. याबाबत वारकरी संप्रदायातून टीका होत आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे चारित्र्य हणन करण्याचे काम बागेश्वर धामाचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते. बागेश्वर शास्त्री महाराज पुण्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने वारकरी संप्रदाय आणि संघटना यांनी टीका केली. तसेच धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या टीकेचा समाचार संत तुकाराम महाराजांवर केलेल्या टीकेचा समाचार महाराजांचे दहावे वंशज ह भ प संभाजी महाराज देहूकर यांनी घेतला.
मती भ्रष्ट आणि क्रिया नष्ट भोंदूबाबा उर्फ बागेश्वर शास्त्री यांच्या अध्यात्मिक उचापती सुरू आहेत, संत आणि संत चरित्रांची निंदा करणारे बागेश्वर महाराजांसारखे रागेश्वरी, भ्रमिष्ट, निंदक तुकोबारायांच्या वेळेला होते.आकाशा एवढ्या विश्वव्यापक चरित्रावर थुंकण्याचा संतापजनक वेडेपणा करून आपल्या भोगेश्वरी संतपणाचे दिवाळी काढले आहे, असा समाचार मोरे महाराज यांनी घेतला होता.काय टीका केली?
संत तुकाराम महाराज यांना त्याची पत्नी जिजाऊ या दररोज काठीने मारत होत्या, त्यावर एकाने विचारले. बायकोकडून मार खाता लाज वाटत नाही का, त्यावर तुकाराम महाराज त्या व्यक्तीस म्हणाले, मारणारी बायको मिळाली म्हणून मी इथपर्यंत आलो. प्रेम करणारी बायको मिळाली असती तर ईश्वरापर्यंत पोहोचता आले असते का, असे विधान एका प्रवचनात बागेश्वर शास्त्री महाराज यांनी केले होते.
पायघड्या घालण्याचे कारण काय?
साहित्यिक आनंद यादव यांनी संतसूर्य या कादंबरीत तुकोबारायांच्या चारित्र्यावर टीका केली होती. वारकऱ्यांनी संताप व्यक्त केल्याने यादव यांना कादंबरी मागे घ्यायला लागली होती. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषवता आले नव्हते. त्यानंतर बागेश्वर महाराजांनी देहूत घातलेल्या पायघड्याबाबत टीका होत आहे. देवस्थानाचे एक माजी अध्यक्ष, दोन माजी सोहळा प्रमुख, एक माजी विश्वस्त उपस्थित होते. तसेच महाराजांना आव्हान देणाऱ्या संभाजी महाराज यांच्या घरी बागेश्वर महाराज देहूत येण्यापूर्वीच पोलीस धडकले होते. दुसरीकडे बागेश्वर महाराजांसाठी पायघड्या घातल्या. दिंडीकाढून स्वागत केले. तुकोबारायांची पगडी गाथा, मूर्ती, उपरणे देऊन स्वागत करण्यात आले. पायघड्या घालण्याचे कारण काय , असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आकाशाएवढ्या विश्वव्यापक चरित्रावर थुंकण्याचा संतापजनक वेडेपणा बागेश्वर शास्त्री महाराज यांनी करून आपल्या भोगेश्वरी संतपणाचे दिवाळी काढले आहे. अशा महाराजांचे देहूत जे स्वागत केले. त्यांना तुकोबारायांची पगडी घातली. दिंडीद्वारे स्वागत केले. नाठाळाच्या माथी हाणो काठी, करायचे सोडून काहींनी लोटांगण घातले. ही बाब तुकोबारायांनाही आवडली नसती.
- संभाजी महाराज देहूकर, वंशज.
बागेश्वरबाबांना जे साहित्य मिळाले, त्यातून तुकोबारायांचे जीवन अभ्यासताना विपर्यास झाला. याबाबत त्यांनी माफी मागितली. गाथा बुडविणारे रामेश्वर भट हे तुकोबारायांचे टाळकरी बनले. एकजण अग्नी झाला, तर दुसयाने पाणी व्हायचे, अशी वारकरी संप्रदायात शिकवण आहे. त्यामुळे कोणी नाराज नाही. आम्हीही त्यांना माफ केले आहे.
-नितीन महाराज मोरे, माजी अध्यक्ष