पुणे: पावसाला सुरू असून सुद्धा पुण्याच्या अनेक भागात पाणी मिळत नाही. पाण्यापासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. २४ बाय ७ पाणी योजना रखडली आहे. काही भागात अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी आणि पुणेकरांची तहान भागवण्यासाठी राज्य सरकार कोणत्या उपाय योजना करीत आहे , असा सवाल काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अधिवेशनात उपस्थित केला.
पावसाळी अधिवेशन पुण्याचा पाणी प्रश्न मांडून आमदार रवींद्र धंगेकर यांनी सरकारचे लक्ष वेधले. धंगेकर म्हणाले, मी सातत्याने पुण्याच्या पाणी प्रश्नाकडे सरकारचे, अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. पालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांसह पुणे शहराला पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पुण्याचा पाण्याचा प्रश्न जटिल होत आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट राहिले आहे. त्यातच स्वच्छ पाणी नागरिकांना मिळत नाही. अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने रोगराई पसरत चालली आहे. म्हणून समान पाणीपुरवठा योजनेकडे आणि शुद्ध पाणीपुरवठ्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. टँकर माफियावर नियंत्रण आणले पाहिजे. अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे रोगराई वाढणार नाही हे पाहिले पाहिजे. पण सरकार पावले उचलताना दिसत नाही अशी नाराजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली.
पुण्यासाठी २१ टीएममसी पाणी साठा मंजूर करा
वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्याला पाणीटंचाईची झळ भासत आहे. त्यामुळे पालिकेने पुरेशा पाणीसाठ्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. पण, तत्कालीन राज्य सरकारने पुणे महापालिकेच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे पुणेकरांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पालिकेच्या हद्दीत समावेश झालेल्या गावांना अतिरिक्त पाणी मंजूर होणे हेही आवश्यक होते. पण, अद्याप वाढीव पाणीसाठा शासनाने मंजूर केला नाही. याचेही परिणाम पुणेकरांना सोसावे लागत आहेत. या त्रासातून मुक्त होण्यासाठी पुण्याला २१ टीएमसी पाणी साठा मंजूर करावा, असेही आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.