पक्ष संघटनेतील पद मागण्यात गैर काय, भुजबळांची मागणीही योग्य; अजित पवार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 08:54 PM2023-06-25T20:54:32+5:302023-06-25T20:54:32+5:30
भुजबळांची मागणीही योग्य
बारामती : पक्ष संघटनेत पद मागितले तर त्यात वाईट काय आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही पक्ष संघटनेची जबाबदारी मागितली त्यात काही गैर नसल्याचे पवार म्हणाले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ चेहरे दाखविण्यासाठीच OBC नेते हवे- देवेंद्र फडणवीस यांची टीका
पुढे बोलताना पवार म्हणाले, मी पक्षाच्या व्यासपीठावर माझी मागणी मांडली आहे. तेथे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी निर्णय पक्षाला घ्यायचा असतो. भुजबळ यांनी मागणी केली आहे, तो त्यांचा अधिकार आहे. सर्वांना बरोबर घेवून जायचे असेल तर पक्षात सर्व घटकांना प्रतिनिधित्व का मिळू नये, त्यामुळे त्यांनी केलेली मागणी योग्यच आहे. यासंबंधी आम्ही चर्चा करू. कोणत्याही पक्षात लोकशाही मार्गाने मते मांडण्याचा अधिकार असला पाहिजे. पक्ष घेईल तो निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल.
राष्ट्रवादीच्या संघटनेत यापूर्वी छगन भुजबळ, बबनराव पाचपुते, आर. आर. पाटील, अरुण गुजराथी, सुनील तटकरे, जयंत पाटील, मधुकर पिचड यांनी अध्यक्षपदे भूषवली आहेत. मी तर जे योग्य वाटेल ते पद द्या अशी मागणी केली असल्याचे पवार म्हणाले. मी गेली ३२ वर्षे आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते ही पदे भूषवली आहेत. आता संघटनेचे काम करण्यासाठी इच्छा प्रदर्शित केली तर वाईट काय असा सवाल त्यांनी केला.