बारामती : जगभरात कोरोेना पसरल्यामुळे सर्वच उद्योगधंद्यावर परिणाम झाला आहे.सर्वत्र मंदीचे वातावरण आहे.त्यामुळे उत्पादित मालाला उठाव नसल्याचे चित्र आहे. मात्र, बारामतीच्या शेतकऱ्यांनी मंदीत संधी साधली आहे.कोरोनामुळे येथील स्थानिक बाजारपेठ अडचणीत आली. अनेक शेतकऱ्यांना कोरोनाचा संसर्गाचा धोका असून देखील घरोघरी जाऊन कलिंगड, खरबूज, चिकू सारख्या फळांसह भाजीपाला विकावा लागला. मात्र, मागणी अभावी कवडीमोल दरात ही शेती उत्पादने विकावी लागल्याचे वास्तव आहे. त्यातून शेतकऱ्यांची लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बारामती येथील बारामती फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी अपवाद ठरली आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे जगभरात सर्वत्र निर्यात बंद आहे. मागणी असल्याने निर्यात बंद करण्याची वेळ आली. मात्र, केवळ दर्जेदार आणि विषमुक्त उत्पादनामुळे या शेतकऱ्यांच्या कंपनीने संकटाच्या काळात संधी साधण्यास यश मिळविले आहे. स्थानिक बाजारपेठेपेक्षा दुप्पटीने या शेतकऱ्यांना युरोपमध्ये दर मिळाला आहे. तालुक्यातील मळद आणि निरावागज येथील शेतकऱ्यांनी करार पद्धतीने २० एकर क्षेत्रावर भेंडी लागवड केली आहे.मात्र, लॉकडाऊनमुळे या भेंडीची निर्यात अडचणीची ठरली होती. आतापर्यंत दीडटन भेंडीची निर्यात करण्यास यश आल्याचे बारामती फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद वरे यांनी ' लोकमत ' शी बोलताना सांगितले.
कृषी विज्ञान केंद्र चे भाजीपाला गुणवत्ता केंद्र बारामती फार्मर्स प्रोडूसर कंपनी ली, बारामती. गोग्रीन एक्सपोर्ट कंपनी यांचे वतीने विषमुक्त (सेंद्रिय) करार शेती या अंतर्गत शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगाला यश आले आहे. येथील भेंडी तोडणीला आल्यावर कोरोनाचा प्रकोप वाढत चालला,यामुळे शेतकरी हतबल झाले होते. परंतु अशाही कठीण परिस्थितीत माल युरोपला पााठविण्यासाठी अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार,मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे ,प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सय्यद शाकीरअली यांच्यासह येथील कृषि विज्ञान केंद्र टीम कसोशीने प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. भेंडी उत्पादक शेतकरी प्रल्हाद वरे, अविनाश देवकाते, कपिल देवकाते, मधुकर देवकाते, डाळ, अमोल देवकाते व ढेकाणे व इतर शेतकऱ्यांची विषमुक्त भेंडीची पहिली ऑर्डर युरोपला रवानाझाली.त्यासाठी भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे यशवंत जगदाळे , तुषार जाधव व गिरीधर खरात यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना महत्वाचे ठरले.