पुणे : महापालिकेच्या कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाकडून कर्वेनगरमध्ये राहणाऱ्या एका चित्रकार दाम्पत्याला नोटीस बजावली असून चित्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगांचा वास येत असल्याचे कारण नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. या दाम्पत्याच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाने पालिकेकडे याबाबत तक्रार केली होती. या दाम्पत्याने या नोटीसीविरुद्ध आवाज उठवताच पालिकेने नोटीस मागे घेतली.
अनामिक आणि कृष्णा कुचन असे या दाम्पत्याचे नाव आहे. हे दोघेही कर्वेनगर भागात भाड्याच्या घरात राहतात. लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प झाल्याने ते आर्थिक अडचणीत आले होते. त्यामुळे त्यांनी आपला संसार स्टुडिओत मांडला. त्यांच्या समोर राहणाऱ्या एका कुटुंबाने रंगांचा वास येत असल्याची तक्रार पालिकेकडे केली होती. पालिकेनेही पडत्या फळाची आज्ञा मानत सतर्कता दाखविली. कूचन यांच्या घरी पाहणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांनी विचारपूस न करता थेट नोटीसच बजावली. पंखा लावून वास घालवा आणि व्यावसायिक काम घरात हलवा असा सल्ला दिला.
पालिकेच्या या पावित्र्याने आश्चर्यचकित झालेल्या या दाम्पत्याने या नोटीशी विरोधात आवाज उठवत विरोध केला. पालिकेला आपली चूक कक्षात आल्यानंतर पालिकेने नोटीस मागे घेतली. गेले दोन महिने हे दाम्पत्य पालिकेच्या नोटीसीला विरोध करीत होते. चित्रकारांनी कुठे चित्र काढायचे हे महापालिका ठरवणार का असा सवाल या दाम्पत्याने केला आहे.