अशोक खरात
खोडद: एकीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत होता. शहरासह ग्रामीण भागही याच्या विळख्यात अडकला होता. अशा परिस्थितीत जुन्नर तालुक्यातही कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच तालुक्यातील धनगरवाडी गाव कोरोनाला रोखण्यासाठी एकवटले आहे. गावाने मागील एक महिन्यापासून एकही नागरिक संक्रमित होऊ दिला नाही. यामुळे धनगरवाडी ग्रामस्थांना कोरोनाची ही लाट रोखण्यात यश आले आहे. धनगरवाडी गावचे सरपंच महेश शेळके, उपसरपंच राजेंद्र शेळके व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
धनगरवाडी गावातील अनेक नागरिक नारायणगाव आणि मुंबई मध्ये स्थायिक आहेत. गावची लोकसंख्या २ हजार ३०६ आहे. मागील वर्षभरात गावातील १२२ नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला होता. यापैकी ११३ रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी गावाचे नियोजनबद्ध कार्य
गावामधील प्रत्येक कुटुंबाचे दररोज करून सर्वेक्षण करून त्यामध्ये ऑक्सिजन पातळी, ताप, खोकला, अंगदुखी याबाबत चौकशी करून कोणाला काही प्राथमिक लक्षणे आहेत का हे जाणून घेतले. संशयित रुग्णांची तात्काळ रॅपिड (अँटीजेन) टेस्ट, तसेच सौम्य लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांचे विलगीकरण करण्यात आले. गावात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी, प्रत्येक कुटुंबासाठी सॅनिटायझर, मास्कचे वाटप, कोरोनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने माहितीपत्रके संपूर्ण गावात वाटण्यात आली. सर्व नागरिकांना आर्सेनिक अल्बम ३० ,व्हिटॅमिन, रोगप्रतिकारक शक्तिवर्धक औषधांचे वाटप करण्यात आले.
"सरपंच पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर गावच्या विकासाचे काम हाती घेतले. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सगळे ठप्प झाले.ग्राम विकासाला खीळ बसू नये म्हणून ग्रामपंचायतीच्या सर्व मासिक सभा देखील ऑनलाईन घेण्यात आल्या आहेत. पुढील काळात परिस्थिती नुसार ग्रामसभा देखील ऑनलाईन घेतल्या जातील.गावात कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून यापुढेही अधिक काळजी घेतली जाईल." असे सरपंच महेश शेळके यांनी सांगितले.
"कोरोनाला अटकाव घालण्यासाठी धनगरवाडी ग्रामपंचायतने केलेली उपाययोजना व घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत.तालुक्यातील इतर गावांनी देखील धनगरवाडी गावचा आदर्श घेऊन करोनाला रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात.यासाठी सरपंच, उपसरपंच व स्थानिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतल्यास नक्कीच सकारात्मक परिस्थिती दिसून येईल." - डॉ.वर्षा गुंजाळ,वैद्यकीय अधिकारी, वारूळवाडी,आरोग्य उपकेंद्र