पिंपरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील मोठ्या कंपन्यांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी काही छोट्या उद्योगांसह वर्कशॉप आदी ठिकाणी सुरक्षिततेबाबत हवी तेवढी काळजी घेतली जात नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. एकीकडे औद्योगिकनगरीत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा होत असताना काही कंपन्यांतील कामगारांच्या सुरक्षिततेबाबत मात्र, चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सुरक्षा सप्ताह केवळ नावापुरताच उरला आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत मोठे, मध्यम, लघु आणि सूक्ष्म असे अनेक उद्योग असून याठिकाणी हजारो कामगार काम करतात. यामध्ये बाहेर राज्यातील कामगारांचाही यामध्ये समावेश आहे. दरम्यान, सध्या ४ ते ११ मार्च या कालावधीत औद्योगिकनगरीत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा होत असून यानिमित्त कामगारांच्या सुरक्षिततेबाबत भोसरी एमआयडीसीतील कंपनी व वर्कशॉपची पाहणी करण्यात आली. भोसरी एमआयडीसीतील जे ब्लॉकमधील प्लॉट क्रमांक ५२ येथील एका वर्कशॉपमध्ये मोठ्या यंत्रांसमोर धोकादायकरित्या कामगार काम करीत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे हातमोजे नव्हते की डोक्यावर हेल्मेटदेखील पहायला मिळाले नाही. अशीच परिस्थिती एस ब्लॉकमध्येही पहायला मिळाली. प्लॉट क्रमांक ८७ येथील एका कंपनीतील कामगार लोखंड कटींग करण्याच्या यंत्रासमोर मोठ्या लोखंडी प्लेट घेवून उभे होते. मात्र, त्यांच्याकडे सुरक्षा साधने दिसून आली नाहीत. लांडेवाडीतील शांतीनगर येथील एका वर्कशॉपमध्ये मोठ्या लोखंडी प्लेटवर वेल्डिंग सुरु होती. याठिकाणी दोन कामगार काम करीत होते. मात्र, दोघांच्या डोळ्यावर गॉगल नव्हते की हेल्मेटदेखील नव्हते. सध्या सर्वत्र राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. यानिमित्त पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये सुरक्षा विषयांवर व्याख्यानांसह प्रथमोपचार प्रात्यक्षिके, आदी कार्यक्रमांचे आयोजन असते. यासह सुरक्षाविषयक साधनेदेखील पुरविली जातात. मात्र, छोट्या कंपन्यांमध्ये तसेच वर्कशॉप्समध्ये सुरक्षिततेबाबत हवी तितकी काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते. तेथील अनेक कर्मचारी धोकादायकरित्या काम करतात. त्यामुळे दुर्देवाने एखादा अपघात घडल्यास यामध्ये कामगाराला मोठ्या नुकसानीला समोरे जावे लागते. (प्रतिनिधी)सुरक्षा साधने पुरविणे गरजेचे कंपनीतील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट, हातमोझे, पायमोझे, गॉगल, उंचावर काम करावयाचे असल्यास सेफ्टी बेल्ट आदी सुरक्षा साधनांची आवश्यकता असते. मात्र, ही साधने अनेकदा कंपनीकडून पुरविली जात नाहीत. एखादी दुर्घटना घडल्यास कर्मचारी जायबंदी होतात. मात्र, एखादी दुर्घटना घडण्यापुर्वीच खबरदारी घेतल्यास दुर्घटना टाळता येवू शकतात. कामगारांना सुरक्षिततेची सर्व साधने पुरविली जात असतात. संघटनेच्या सभासदांचीही काळजी घेतली जाते. काही छोट्या वर्कशॉपच्या ठिकाणी ही साधने पुरविली जात नसतील. सुरक्षिततेबाबत काळजी घेण्यासाठी वेळोवेळी आवाहन केले जात आहे, असे पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले.
कामगारांच्या सुरक्षिततेचे काय?
By admin | Published: March 05, 2017 4:28 AM