पुणे : पुरंदर तालुक्यात पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. तसेच विहिरींचा पाणीसाठाही आटू लागला आहे. त्यामुळे पिकांना पाणी मिळणे अवघड झाले आहे. मात्र, तालुक्यातील पिंपळे येथील रहिवासी विठ्ठल नारायण खेनट आणि अनंता कृष्णा क्षीरसागर यांच्या शेतातील सामूहिक विहिरीतील पाणी अचानक फेसाळले, या फेसाळलेल्या पाण्याचे गूढ काय आहे हे अद्यापही कळू शकले नाही. परंतु , या फेसाळलेल्या दूषित पाण्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतातील पेरू, सिताफळ आणि आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. पिंपळे (ता. पुरंदर) येथील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून पेरू, सिताफळ आणि आंब्याचे पीक घेत आहेत. फळबागांसाठी या दोन्ही शेतकऱ्यांनी साडेसहा एकर क्षेत्रात सामूहिक विहीर तयार केली आहे. त्याच विहिरीवर हे दोन्हीही शेतकरी आपल्या बागांना पाणी देतात. मात्र, २ दिवसांपूर्वी अनंता क्षीरसागर हे पहाटे फळबागांना पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना अचानक विहिरीतील पाण्यावर फेस आल्याचे दिसले. त्या वेळी त्यांना या फेसामागचे गूढ उकलले नाही. त्यांनी विहिरीतील हेच फेसाळलेले पाणी पेरू, सीताफळ आणि आंब्याच्या बागांना दिले, त्यामुळे या दूषित पाण्यामुळे संपूर्ण पीक पिवळे पडून जळायला लागले आहे. दूषित पाण्याच्या वापरामुळे या शेतकऱ्यांच्या घरातील महिला आणि लहान मुलांच्या अंगावर लालसर चट्टे पडून त्यांंना त्वचेचे विकार जडले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शेतातील पिकांसोबत जनावरांनाही या दूषित पाण्याचा त्रास होत आहे.
....................................
याबाबत तहसीलदार, तलाठी आणि ग्रामसेवक हे संयुक्त नुकसानीचा पंचनामा करणार असून, नुकसानीनुसार त्यांना मदत दिली जाईल. तसेच दूषित पाण्याचा नमुना घेऊन तो तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. - देवेन्द्र ढगे, तालुका कृषि अधिकारी,पुरंदर