धायरी : अब्दुल सत्तरचं कराययं काय ? खाली डोकं वर पाय... अशा घोषणा देताना खडकवासला राष्ट्रवादी युवकच्या वतीने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध नोंदविला. सुप्रिया सुळे यांच्याबाबत मुक्ताफळे उधळणारे राज्याचे कृषी मंत्री यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. खडकवासला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद दबडे यांच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर पुलाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल राज्याचे कृषिमंत्री मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी अपमानकारक शब्द वापरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा त्वरित राजीनामा घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबकअण्णा मोकाशी, दिलीप बराटे, शुक्राचार्य वांजळे, सायली वांजळे, अनिता इंगळे, स्वाती पोकळे, भूपेंद्र मोरे, सुप्रिया भूमकर, कुणाल पोकळे, नुर सय्यद, चंद्रशेखर पोकळे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष शरद दबडे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या आंदोलनात ठाकरे गटाचे पदाधिकारी...
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते. यामुळे खडकवासला मतदार संघातील राष्ट्रवादी व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यातील ताळमेळ अधोरेखित होत आहे. त्याबरोबरीने भारतीय काँग्रेसचे देखील काही पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे तिन्ही पक्षांनी मिळून यावेळी अब्दुल सत्तार यांचा निषेध केला, अशी चर्चा देखील नागरिकांमध्ये रंगली.