पुणे-
बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती? बाबरी पाडली त्यावेळी आपण तिथं उपस्थित होतो, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काल झालेल्या भाजपाच्या सभेत केला. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी खोचक टीका केली आहे. बाबरी पाडली गेली तेव्हा फडणवीसांचं वय काय होतं? असा सवाल रुपाली पाटील यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका यामागे भाजपाचा हात आहे. मुख्यमंत्रीपदाची आस लावून बसलेले देवेंद्र फडणवीस हे सर्व करत आहेत, असा आरोप रुपाली पाटील यांनी यावेळी केला. राज ठाकरे यांच्या कालच्या औरंगाबादमधील भाषणात सर्वाधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर होती. त्यावरही रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
"काही प्रवृत्तींचा राज्यात दंगली घडवण्याचा कट आहे. मात्र तसं राज्यात होणार नाही. महाविकास आघाडी यासाठी भक्कम आहे. राज ठाकरेंच्या भाषणात अनेक मुद्दे आले आहेत आणि त्याची तपासणी पोलीस करत आहेत. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या भाषणामुळे जर काही घटना झाल्या तर कारवाई होईलच", असं रुपाली पाटील म्हणाल्या.
राष्ट्रवादीमध्ये सर्व धर्माचे लोक आहेत. ते जातीयवादी अजिबात नाहीत. अनेक धर्माचे आणि जातीचे लोक आज पक्षात काम करत आहेत, असं रुपाली पाटील म्हणाल्या. राज्यात जातीजातींमध्ये विष कालवण्याचं काम शरद पवार यांनी केलं असा आरोप राज ठाकरे यांनी सभेत केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना रुपाली पाटील प्रत्युत्तर दिलं.
"ज्या पक्षात सर्व जाती-धर्माचे जिथं ब्राम्हण, मराठा, मुस्लिम, हिंदू, शीख आणि ओबीसीच्या पोटजाती आहेत. म्हणजेच अठरा पगड जातीचे पदाधिकारी पक्षात काम करत आहेत. अशा पक्षाचा अध्यक्ष जातीयवादी कसा काय असू शकतो असा प्रश्न मला पडतो", असं रुपाली पाटील म्हणाल्या.
२१ व्या शतकात जाती-धर्माचं राजकारण दुर्दैवी"लोकमान्य टिळक जरी ब्राम्हण होते तरी ते ब्राम्हण म्हणून राहिले नव्हते. ते सर्वधर्मासाठी काम करत होते. ते समाजसुधारक होते. त्यांनी जात पाहिली नव्हती. जे हुतात्मे आहेत त्यांनी त्यांचं त्यांचं काम केलं. पण त्या जातीचा आहे म्हणून त्यांनी ते काम केलं हे आता आपण बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी जर लोकमान्य टिळकांनी बांधली असेल तर ती शोधून काढणारे महात्मा ज्योतिबा फुले होते. लोकमान्य टिळकांना जेव्हा अटक झाली होती. तेव्हा ज्योतिबा फुले हे जामीनदार होते. मग त्यावेळी टिळकांना अटक झाली मग त्यांच्या समाजातील इतर कुठे होते? का महात्मा ज्योतिबा फुलेंनीच जामीन दिला? असं आपण घेऊन बसणार का? आता २१ व्या षटकात जातीधर्माचं राजकारण करणं हे दुर्दैवी आहे", असं रुपाली पाटील म्हणाल्या.