जो कारखाना चालवू शकत नाही तो विकास काय करणार? अजित पवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 01:14 PM2024-11-17T13:14:19+5:302024-11-17T13:17:41+5:30

विचार करा जो कारखाना चालवू शकत नाही तो जुन्नरकरांचा काय विकास करणार? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

What will a developer who cannot run a factory do? Ajit Pawar's question | जो कारखाना चालवू शकत नाही तो विकास काय करणार? अजित पवार यांचा सवाल

जो कारखाना चालवू शकत नाही तो विकास काय करणार? अजित पवार यांचा सवाल

ओतूर : उमेदवार अनेक उभे राहतात तो त्यांचा अधिकार आहे. पण दहा वर्षांत तुम्ही इतरांच्या तुलनेत उसाला कमी भाव दिला. माळेगाव व सोमेश्वर साखर कारखान्यांचे भाव पाहिले तर ३६०० आहे. आणि तुम्हाला विघ्नहर सहकारी साखर कारखाना ३२०० देतो तोही बळं-बळं. याचा विचार करा जो कारखाना चालवू शकत नाही तो जुन्नरकरांचा काय विकास करणार? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. यावेळी जुन्नरचे आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्यावर अजित पवार यांनी टीका केली.  

दरम्यान, अतुल हा जुन्नरच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी राहिला आहे. त्याने कधीही जातिपातीचे राजकारण केले नाही. एक कार्यकुशल, कर्तव्यदक्ष, सुसंस्कृत, संवेदनशील, अभ्यासू नेतृत्व म्हणून मी त्याच्याकडे पाहत आहे, असेही ते म्हणाले. महायुतीचे उमेदवार आमदार अतुल बेनके यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.  

अजित पवार पुढे बोलतांना म्हणाले,'विरोधक टीका करतात की, राज्याची तिजोरी रिकामी केली. आम्ही भेदभाव करत नाही. आम्ही सर्वांना पुढे घेऊन चाललो आहे. त्यासाठी लाडकी बहीण योजना, मुलींच्या शिक्षणासाठी ५०% सवलत, शेतकऱ्यांसाठी वीजबिले माफ केली आहेत यासह अनेक योजना भविष्यात आपण सुरू करणार आहे. जुन्नर तालुक्यातील बिबट प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांसाठी दिवसा लाइट देणार आहोत. सत्तेत असल्यावर विकासकामे करता येतात. आम्ही सत्तेसाठी हपापलो नाही; पण ज्यांनी आम्हाला निवडून दिले त्यांना न्याय देण्यासाठी नवीन कामांना मंजुरी देण्यासाठी; तसेच काही कामांचा ‘स्टे’ उठवण्यासाठी आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. मधल्या काळात कांदा प्रश्नामुळे आम्हाला लोकसभेला चांगलाच फटका बसला; पण त्या चुका सुधारण्यासाठी कांदा निर्यातबंदी उठवली. आज माझा कांदा उत्पादक शेतकरी खूश आहे. आदिवासी भागाचा प्रमुख हिरडा कारखान्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. मंजुरीपत्र देखील लवकरच देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अतुल बेनके म्हणाले, गेली पाच वर्षे तालुक्यात प्रामाणिक सेवा करत आहे. तरुण पिढीला अधिकारी बनवण्यासाठी ‘एमपीएससी’, ‘यूपीएससी’ यांची लायब्ररी आणि प्रशिक्षण केंद्र, शिवनेरी किल्ला संवर्धन, आदिवासी विभागात कुकडेश्वर मंदिरासाठी, तसेच हिरडा कारखाना यासाठी अजित पवारांनी मोठा निधी मिळाला. मुस्लीम बांधवांना मोठा निधी मिळाला, पिंपळगावच्या राम मंदिरासाठी, आरोग्याच्या दृष्टिकोनातून नारायणगाव, ओतूर ग्रामीण रुग्णालय अशी अनेक कामे केली. कुकडी प्रकल्पातील पाणी देण्याचे आपण काम केले. त्यामुळे जुन्नरकरांनी मला ‘पाणीदार आमदार’ पदवी दिली आहे.

‘जुन्नरच्या पाण्याला हात लावू देणार नाही’

जुन्नर-आंबेगाव तालुक्यांच्या धरणांमधील पाण्याचे योगदान मोठे आहे. लोकांच्या जमिनी गेल्या आहेत. पाण्याचा अधिकार आपला आहे. आपल्याला फेरनियोजनाचे पाणी आणे पठार, कोपरे मांडवे येथे न्यायचे आहे. वल्लभशेठचा मुलगा जिवंत असेपर्यंत आपल्या पाण्याला कोण हात लावू शकणार नाही. कर्जत-जामखेडचे युवराज म्हणत असतील पाणी पळवू. महाराजांच्या जन्मभूमीतील आम्ही मावळे आहोत. आमच्या हक्काच्या पाण्यासाठी परकीय असो स्वकीय असो, कोणी जरी आमच्यासमोर उभा राहिला तरी आम्ही जुन्नरच्या पाण्याला हात लावून देणार नाही. माझी स्पर्धा कुणाबरोबर नाही. मी प्रामाणिक काम करत आलो आहे आणि प्रामाणिक काम करत राहणार असल्याचेही आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

Web Title: What will a developer who cannot run a factory do? Ajit Pawar's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.