निवडणुकीसाठी आपल्या वाट्याला किती जागा येणार; पुण्यातील तिन्ही पक्षाच्या शहराध्यक्षांना आलं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 07:27 PM2022-02-15T19:27:09+5:302022-02-15T19:35:34+5:30
महापालिका निवडणुकीत जागा वाटपाचे सूत्र काय राहील व आपल्या वाट्याला किती जागा येतील, यावरूनच राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पुण्यातील नेत्यांना धाकधूक आहे
पुणे : महापालिका निवडणुकीत जागा वाटपाचे सूत्र काय राहील व आपल्या वाट्याला किती जागा येतील, यावरूनच राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पुण्यातील नेत्यांना धाकधूक आहे. आघाडी व्हावी; पण जागा वाटपात आपला कमाल फायदा व्हावा या हेतूनेच स्थानिक स्तरावर नेत्यांकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे.
महाविकास आघाडी राज्यातील सत्तेत शिवसेना प्रमुख घटक पक्ष असला तरी शहरातील राजकीयस्तरावर मात्र तो तिसऱ्या क्रमाकांवर, नगरसेवक संख्या ९ आहे. दुसऱ्या क्रमाकांवर काँग्रेस १० नगरसेवक, तर पहिल्या क्रमाकांवर राष्ट्रवादी काँग्रेस, ४१ नगरसेवक आहेत. महाविकास आघाडी केली तर त्याचा राजकीय फायदा मिळेल, मतांची विभागणी टळेल याची खात्री स्थानिक नेत्यांना आहे, मात्र जागा वाटपात नगरसेवकांच्या संख्येच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहील याची भीती त्यांना आहे.
जागा वाटपासाठी विद्यमान नगरसेवकांची संख्या, गत निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नगरसेवकांची संख्या हेच सर्वसाधारण सूत्र राहील, असे चिन्ह आहे. त्यामुळे एकूण जागांच्या तुलनेत काँग्रेसच्या व नंतर शिवसेनेच्याही वाट्याला फारच कमी जागा येण्याची शक्यता आहे. त्यांना ती भीती तर राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी केली तर हक्काच्या जागांवर पाणी सोडावे लागण्याची भीती आहे. त्यामुळेच तीनही पक्षांकडून वारंवार स्वबळाची घोषणा केली जात आहे. नव्या प्रभाग रचनेनुसार नगरसेवकांची एकूण संख्या १७३ आहे. ५० टक्के आरक्षणामुळे त्यातील निम्म्या म्हणजे ८७ महिला आहेत. त्याशिवाय आता इतर मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती जमातीचे आरक्षणही पडणार आहे. सर्वच पक्षाचे इच्छुक उमेदवार आपापले प्रभाग निवडून कामालाही लागले आहेत. आघाडी झालीच तर त्यांच्यातील कोणाला कसे शांत बसावायचे, नाही बसले तर बंडखोरीची शक्यता व त्यामुळे होणारे नुकसान अशा बऱ्याच गोष्टींवर तीनही पक्षांच्या शहरातील नेत्यांमध्ये सध्या पक्षपातळीवर जोरदार चर्चा सुरू आहे.
आमची तयारी सर्व जागांची
''प्रदेशाध्यक्षांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम आहे. त्यांच्याच आदेशानुसार आम्ही सर्व जागा लढविण्याच्या तयारीत आहोत. त्यासाठीच बैठका, संघटन सुरू असल्याचे रमेश बागवे (अध्यक्ष, शहर काँग्रेस) म्हणाले आहेत.''
''शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच याबाबत काय तो निर्णय घेतील. प्रत्येक प्रभागात आमच्या शाखा व कार्यकर्तेही आहेत. सक्षम उमेदवारही तयार आहेत. त्यामुळे आघाडी किंवा स्वबळ आमची कशालाही तयारी असल्याचे संजय मोरे (शहरप्रमुख, शिवसेना) यांनी सांगितले आहे.''
''गेल्या पाच वर्षांत महापालिकेत जे काय झाले ते शहराच्या भविष्यासाठी वाईटच आहे. ते थांबवायचे असेल तर सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी जागावाटप हा मुद्दा होऊ नये असे वाटते. पक्षश्रेष्ठी ठरवतील तो निर्णय आम्ही मान्य करू असे प्रशांत जगताप (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी सांगितले आहे.''