लोककलावंतांची शासनाकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल झाला असला तरी नाट्यगृहे अद्याप बंद आहेत आणि जत्रा, यात्रा, उत्सव रद्द करण्यात असल्याने हातावर पोट असलेल्या लोककलावंतांवर दीड वर्षांपासून बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शासनाने लोककलावंतांना दिलासा देण्यासाठी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, या पैशात काय होणार आणि ही रक्कम किती लोककलावंतांना मिळणार? यातच कलावंतांकडून जनजागृतीचे कार्यक्रमही करून घेतले जाणार आहेत. त्यासाठी एका कार्यक्रमाला लोककलावंतांना केवळ सव्वाशे रूपये मिळणार आहेत. कलावंतांचा काही सन्मान ठेवणार का नाही? असा सवाल लोककलावंतांनी उपस्थित केला आहे. आम्हाला कार्यक्रम करण्याची किंवा आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी लोककलावंतांनी केली आहे.
गतवर्षीच्या लॉकडाऊनच्या काळापासूनच लोककलावंतांच्या हाताला काम नसल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. अनेक कलावंत भाजी विक्री, रिक्षा चालविणे, वडापावचा स्टॉल टाकणे, सेल्समन, गाडी धुणे, वॉचमन अशी कामे करून दिवस ढकलत आहेत. जत्रा, यात्रेचा सिझन हातचा गेला. आता गणेशोत्सवही साधेपणाने साजरा केला जाणार आहे. अशा परिस्थितीत जगायचं कसं? असे संकट लोककलावंतांसमोर उभे राहिले आहे. जिल्ह्यात ७० हजारांपेक्षा अधिक लोककलावंत आहेत. शासन किती कलावंतांना मदत करणार? त्यासाठी कोणते निकष लावणार? यावर अद्यापही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
चौकट
गेल्या दीड वर्षांपासून कार्यक्रमांवर बंदी असल्याने अत्यंत बिकट परिस्थिती ओढवली आहे. सोनं-नाणं गहाण ठेवून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र अतिक्रमणवाल्यांनी गाडी उचलून नेल्याने महिन्याभरापासून काम बंद आहे. घराचे वीजबिल १७ हजार रूपये इतके आले आहे. पण पैसे भरण्याची ऐपत नसल्याने वीज कापण्यात आली आहे. शासनाने पाच हजार रूपये देण्याचे जाहीर केले आहे. पण या पैशात काय होणार? मुलांचे शिक्षण, घरखर्च कसा निघणार? त्यापेक्षा आम्हाला गणेशोत्सव, दसरा दिवाळीमध्ये कार्यक्रम करण्याची परवानगी द्या. त्यातून किमान सणासुदीला घरात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणे शक्य होईल.”
-स्वाती पर्वे, लोकगायिका
चौकट
“सद्यस्थितीत मी तळेगाव दाभाडे येथे घराबाहेर नाश्त्याचा स्टॉल लावला आहे. माझ्या ग्रुपमधील अनेक मुली भाजीविक्रीचा व्यवसाय तर कुणी वॉचमन, सेल्समनचे काम करीत आहे. जिल्ह्यात अनेक लोककलावंत आहेत, त्यातील किती कलावंतांना मदत मिळणार हे माहिती नाही. आमचे नाव यादीत असेल तरच आमचे भाग्य असेल.”
-संगीता लाखे, लावणी नृत्यांगना
चौकट
“राज्य सरकार कलावंतांकडून जनजागृतीचे कार्यक्रमही करून घेणार आहे. मात्र, या कार्यक्रमांची पॉलिसी ही हास्यास्पद आहे. ‘एक नको पण कुत्रा आवर’ अशी शासनाची स्थिती आहे. एका कलावंतांना पाचशे रुपये दिले जाणार आणि चार वेगवेगळ्या गावांत जाऊन कलावंताने कार्यक्रम करायचे. याचा अर्थ एका कार्यक्रमासाठी कलावंताला सव्वाशे रुपये मिळणार. कलावंतांचा काही सन्मान ठेवणार की नाही? एखाद्या कामगारसुद्धा दिवसाला सातशे रूपये कमवतो. इतक्या तुटपुंज्या मानधनात काम करवून घेणे हा कलावंतांचा अपमान आहे. गेल्या दीड वर्षांपासून हाताला काम नाही. माझ्यावरही केटरिंगचा व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. शासन कलावंतांचा विचार करणार की नाही?”
- शाहीर हेमंत मावळे
चौकट
“दीड ते दोन वर्षांपूर्वी सव्वाशे संघटनांचे मिळून ‘महाकलामंडल’ स्थापन करण्यात आले. त्यामुळे आमच्याकडे सर्व कलावंतांची माहिती आहे. जिल्ह्यात लोककलावंतांची संख्या अधिक आहे. यासाठी लोककलावंतांची वर्गवारी व्हायला हवी. शासनाने जाहीर केलेली मदत योग्य कलावंतांपर्यंत पोहोचली पाहिजे.”
- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, नाट्य परिषद पुणे आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ