पुणे : औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भोंगे उतरवण्याबाबत कडक भूमिका मांडली आहे. मागील सभेत त्यांनी ३ तारखेचा अल्टिमेटम दिला होता. यावेळी राज ठाकरे यांनी रमजानमध्ये अडथळा येऊ नये या दृष्टीने ४ तारखेपर्यंत भोंगे उतरवण्यास सांगितले आहेत. त्यांनी न ऐकल्यास मशीदसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावली जाईल. असा सज्जड इशारा त्यांनी सभेत दिला आहे. त्यावेळी भोंगे उतरवण्याबाबत राज यांनी सर्व प्रार्थना स्थळांचा उल्लेख केला होता. त्यामध्ये मशिदीवरील भोंगे उतरवल्यावर इतर प्रार्थना स्थळांवरील भोंगे उतरवले गेले पाहिजेत असे त्यांनी सांगितले होते. या वक्तव्यावर पुण्यातून ब्राह्मण महासंघाने आपली भूमिका मांडली आहे. सर्व प्रार्थनास्थळांचे भोंगे बंद केले तर हिंदूंच्या सणांचं काय होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हिंदू धर्मात गणेशोत्सव, दिवाळी, दहीहंडी, नवरात्री, ग्रामदैवत यात्रा, उरूस, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, असे असंख्य सण साजरे केले जातात. हे सार्वजनिक रित्या साजरे केल्याने रस्त्यावर मांडव टाकून उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी स्पिकरही लावले जातात. राज ठाकरेंनी काल रस्त्यावर नमाज पठाण करणे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. मग आपल्या सणांचं काय होणार असा सवाल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरेंनी वक्तव्याचा वक्तव्यांचा पुनर्विचार करावा
राज ठाकरे यांनी मशिदीचा उल्लेख तुम्ही तुमचे भोंगे बंद करा, मग आम्ही आमचे करू असे सांगितले होते. मात्र आपल्याकडे वर्षभर साजरे होणाऱ्या सणांमध्ये धार्मिक विधीसाठीसुद्धा लाउडस्पीकर लावले जातात. त्यामुळे आपणही सर्व संकटात येऊ शकतो. ते बंद करतात म्हणून आपले सण, परंपरा आपण बंद करणे योग्य ठरेल का, असा सवाल दवे यांनी केला आहे. नमाज एका मर्यादेपर्यंत किंवा दिवसापुरते मर्यादित असते. मात्र आपले सण वर्षभर होत असतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपली वक्तव्ये पाहून त्याचा पुनर्विचार व्हावा असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.