बारामती : शेती संदर्भात अनेक प्रश्न आहेत. ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी अधिक आहे. मात्र, अलीकडे याबाबत दृष्टीकोन बदलल्याचे चित्र आहे. कधीकधी दिल्लीत चर्चा करण्याची संधी मिळते. यावेळी खासगीत झालेल्या बोलण्यात त्यांना पिकविणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांचे महत्व अधिक असल्याचे जाणवते. मात्र, पिकविणारा कर्जबाजारी झाल्यावर, संकटात सापडल्यावर खाणाऱ्यांना अवलंबुन रहावे लागेल, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार वर केली.
बारामती येथे जागतिक स्तरावरील आयोजित कृषि प्रदर्शन उदघाटन कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी त्यांनी कांदा आणि मळी निर्यातबंदीकडे लक्ष वेधले. पवार पुढे म्हणाले, साखर कारखान्यात आपण साखरेबरोबरच मळी, इथेनाॅल,अल्कोहाल उत्पादन करतो. कारखाना परिसरात मळी मोलॅसिसचे टॅंक असतात. मळीला निर्यातीनंतरच किंमत मिळते. त्यामुळे ती निर्यात का करु नये, असा सवाल पवार यांनी केला. केंद्राने मळी निर्यात करायची,असे सांगितले आहे.
शेतकऱ्याला त्याच्या घामाच्या मिळणाऱ्या किंमतीला विरोध होत असेल. तर तो शेतकऱ्याचा हितकर्ता नाही, असे चित्र सध्या देशात दिसुन येते. शेतीमालाशी संबंधित थोडी किंमत वाढली की, सरकार लगेच भावनावश होते. त्या किंमतीला रोखण्याचा प्रयत्न होतो. शेतकऱ्याचा विचार केला जात नाही. शेतीवरील वाढलेला बोजा कमी केला जात नाही. तो कमी करण्याची गरज आहे. देश स्वतंत्र झाल्यावर ३५ कोटी लोकसंख्या असताना ८० टक्के लोकसंख्या शेतीव्यवसायात होती. आजच्या लोकसंख्येच्या तुलनेत ५६ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबुन आहे. मात्र, शेतजमिनीत मोठी घट झाल्याचे पवार यांनी नमुद केले.
....कांद्याच्या माळा घाला,अन्यथा कवड्यच्या माळा घाला
केंद्रात मंत्री असताना एकदा विरोधी पक्षाचे भाजपचे लोक गळ्यात कांद्याच्या माळा घालून पार्लमेंटमध्ये आले. त्यांनी कांद्याच्या वाढलेल्या किंमतीला कृषिमंत्री जबाबदार असल्याचे सांगत माझ्या राजीनाम्याची मागणी केली. यावर मला अध्यक्षांनी खुलासा करण्यास सांगितला. कांदाउत्पादक शेतकरी देशातील जिरायती असल्याचे सांगत कांदा निर्यात बंदी मागे घेणार नाही. गळ्यात कांद्याच्या माळा घाला, अन्यथा केवड्याच्या माळा घाला, शेतकऱ्याला त्याच्या मालाची किंमत मिळालीच पाहिजे. त्यासाठी काहीही सहन करायची माझी तयारी असल्याचे विरोधकांना सांगितले. त्यावर विरोधक गप्प बसल्याची आठवण पवार यांनी सांगितली.
...दहातोंडी रावणाप्रमाणे शेतीप्रश्न
शेतीसंदर्भात एकदा यशवंतराव चव्हाण यांना ‘देशाचे शेती प्रश्न काय आणि किती? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चव्हाण यांनी दहातोंडी रावणाप्रमाणे शेतीप्रश्न असल्याचे उत्तर दिल्याची आठवण पवार यांनी सांगितली. शेतकऱ्यांसमोर जमिनीचा पोत, पाणी, खताचा, बियाणाचा, शेतीमालाच्या भावाचा असे अनेक प्रश्न आहेत. त्याची सोडवणुक करणे, ही शेतकऱ्यांना मदत आहे. यामध्ये केंंद्र सरकारची जबाबदारी अधिक असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांंनी सांगितले.