पिंपरी सांडस : प्रत्यक्षात कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या गाड्या हवेतून तर येणार नाही ना? असा सवाल करीत परिसरातील ग्रामस्थांनी कचरा डेपोला विरोध केला आहे.ग्रामस्थांनी वनविभाग व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे आपला विरोध असल्याचे सांगितले असूनसुद्धा महानगरपालिका मात्र पिंपरी सांडस येथील वन जमिनीमध्ये कचरा टाकण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या जरी एसी रूममध्ये बसून मिळविल्या तरी प्रत्यक्ष त्या जागेवरती कचरा टाकण्यासाठी पिंपरी सांडस ग्रामस्थ व परिसरातील लोकांचा तीव्र विरोध राहणार आहे. कचरा टाकण्याचा प्रयत्न केल्यास रास्ता रोको किंवा अन्य मार्ग वापरण्याची ग्रामस्थांची तयारी आहे. माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप म्हणाले की, कचरा डेपो हा आम्ही होऊ देणारच नाही. नगरपालिकेने कचरा डेपो पिंपरी सांडस येथे करण्यासाठी कितीही प्रयत्न केले किंवा केंद्रातून राज्यातून सत्तेचा गैरवापर करुन जागा मिळवली किंवा परवानगी घेतली तरीसुद्धा आम्ही कचरा डेपोला विरोधच करणार. कचरा डेपोला विरोध करण्यासाठी कोणत्याही प्रकारची किंमत आम्हाला मोजावी लागली तरीसुद्धा आम्ही मागेपुढे पाहणार नाही. माहिती सेवा समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी कचरा डेपो संदर्भात सांगितले की, कचरा डेपोला पिंपरी सांडस भागातून विरोधच आहे. ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया शासनाने घेतल्या पाहिजे. महानगरपालिकेने स्वत:ची घाण स्वत:च्या भागातच जिरवावी. तुमची घाण आमच्याकडे नको, आम्ही परिसरातील सर्व संघटना एकत्र येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारून याला विरोध करून आणि यात काही विपरीत घडले तर याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल. (वार्ताहर)
पुण्याचा कचरा काय हवेतून टाकणार का?
By admin | Published: February 27, 2015 5:57 AM