आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल; मला भीती वाटते; खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:52 IST2024-12-24T18:51:08+5:302024-12-24T18:52:18+5:30

आजवर जे सिनेमात गुन्हेगारीचं चित्र पाहायला मिळायचं ते महाराष्ट्राला वास्तवात दिसू लागले आहे.

What will the next Maharashtra be like? I am scared; MP Supriya Sule expressed her concern | आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल; मला भीती वाटते; खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता

आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल; मला भीती वाटते; खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता

बारामती : परभणीतील घटना महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे. अर्थात या ठिकाणी शरद पवार गेल्यानंतर राज्यातील इतर नेते, लोक गेले. तोपर्यंत कुणीही त्या ठिकाणी भेट द्यायला गेले नव्हते. मात्र, फक्त पोलिसांची बदली करून चालणार नाही. त्यामुळे कोण आहे, हे शोधले पाहिजे. बीड आणि परभणीत ज्या घटना झाल्या, त्यावर विश्वास बसत नाही. आजवर जे सिनेमात गुन्हेगारीचं चित्र पाहायला मिळायचं ते महाराष्ट्राला वास्तवात दिसू लागले आहे. या घटना महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत. आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल, अशी भीती मला वाटते, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी बीड आणि परभणी येथील घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

खासदार सुळे मंगळवारी (दि. २४) बारामती दौऱ्यावर होत्या. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी सुळे पुढे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत, त्यांनी महाराष्ट्राला न्याय द्यावा. सुरेश धस, नमिता मुंडदा यांचे कौतुक करते. कारण राजकीय मतभेद बाजूला ठेवून लढण्याची आज आवश्यकता आहे. मात्र, धनंजय मुंडे यांच्याबाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा, असे सुळे म्हणाल्या. बारामतीसह राज्यात क्राईम वाढत आहे, जेव्हा गुन्हेगारी वाढते तेव्हा आर्थिक विकास मंदावतो. केंद्र सरकारचा आजवरचा डेटा देखील हेच सांगतो आहे. महाराष्ट्रात वाढती गुन्हेगारी ही अर्थकारणाला खीळ बसवणारी ठरेल, असा धोका असल्याचे त्या म्हणाल्या.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोठा पराभव स्वीकारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ८ व ९ जानेवारी रोजी मुंबईत बैठक होणार असून, पक्षाची आगामी काळातील भूमिका या बैठकीत ठरणार असल्याचे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहित्य संमेलनाला येणार आहेत. आम्ही सगळे मिळून काम करतोय. साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वेसाठी अश्विनी वैष्णव प्रयत्न करतील यासाठी आम्ही मिळून प्रयत्न केला. महाराष्ट्रातील हे मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होत असून ते यशस्वी करण्यावर आमचा भर राहणार आहे, असे त्या म्हणाल्या. 

Web Title: What will the next Maharashtra be like? I am scared; MP Supriya Sule expressed her concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.