बारामती (जि. पुणे) : चर्चा काही असो, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणीही खासदार केंद्राच्या मंत्रिमंडळात जाणार नाही, हे पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्पष्ट करतो, अशा शब्दात शरद पवार यांनी बुधवारी सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिमंडळातील चर्चेला पूर्ण विराम दिला.पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही भूमिका स्पष्ट केली. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएत सहभागी होणार अशी चर्चा होती. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी झालेल्या यूपीएच्या बैठकीला पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे कोणीही नेते उपस्थित राहिले नाहीत. तेव्हापासून या चर्चेला अधिक वेग आला होता. याबाबत फारसे भाष्य न करता पवार यांनी राष्ट्रवादीचे कोणीही मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले.राज्य सरकारच्या कर्जमाफीवर देखील पवार यांनी टीका केली. ३४ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, असे जाहीर केले जाते. मात्र, राज्याच्या कानाकोपरात गेल्यावर एकही शेतकरी कर्जमाफ झाले आहे, असे ठामपणे सांगत नाही, असेही त्यांनी सांगितले.देशात अस्वस्थता आहे. परंतु, भाजपाला सक्षम पर्याय नाही, हे देखील तितकेच खरे आहे. सध्या वेगवेगळे निर्णय घेतले जातात. त्याच अनुषंगाने लालूप्रसाद यादव सारख्या ‘मासबेस’ नेत्याने घेतलेली भूमिका, त्यांना मिळालेला पाठिंबा महत्त्वाचा आहे.देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची भूमिका देखील सामंजस्याची आहे. राज्यात देखील काँग्रेसचे नेतृत्व सामंजस्याच्या भूमिकेवर भर देत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
चर्चा काही असो, राष्ट्रवादीचे खासदार केंद्राच्या मंत्रिमंडळात जाणार नाहीत - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 3:14 AM