लोकमत न्यूज नेटवर्क, बारामती (जि. पुणे) : ‘काही लोक त्यांच्याकडे असलेल्या सत्तेचा गैरवापर करतात. लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवावी लागेल. त्यासाठी येणारी निवडणूक आहे. लोकसभेत तुम्ही चांगले काम केले. आता काही झाले तरी महाराष्ट्र हातात घ्यायचा आहे’, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे जनसंवाद दाैऱ्याच्या वेळी आयोजित सभेत पवार बोलत होते. ‘शेतकऱ्यांच्या ऊसगाळपासह, ऊस दर, साखर, वीज, इथेनाॅलच्या दराबाबत सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने साखर धंदा अडचणीत आला. संस्थाचालकांना माझी विनंती आहे, आम्ही तुम्हाला सगळ्यांच्या भल्यासाठी पाठिंबा दिला. मात्र, या सगळ्यांच्या भल्याची तुम्हाला आठवण नसेल, तर तुमच्यासाठी काय करायचे, याचा निकाल आम्हाला घ्यावा लागेल,’ अशा शब्दांत पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह साखर कारखाना पदाधिकाऱ्यांचे नाव न घेता इशारा दिला.
आतापासूनच बारामतीत तळ
शरद पवार यांनी आतापासूनच बारामती शहर आणि तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी घातलेले लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिंता वाढवणारे आहे. त्यांनी डाॅक्टर, व्यापारी, वकील आदी मेळावे घेत दुष्काळी दाैरे केले. त्यापाठोपाठ दुसऱ्याच आठवड्यात तीन दिवस दाैऱ्यावर पवार आले आहेत. मंगळवारी पहिल्याच दिवशी त्यांनी युगेंद्र पवार यांना बरोबर घेत निंबूत, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे, करंजे पूल, माळेगाव येथे जनसंवाद दाैरे आयोजित करीत संवाद साधला.