पुणे : पुणेपोलिस दलात कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांचा व्हॉट्सॲप स्टेटसवरून सध्या पुणे शहरात मोठी चर्चा रंगली आहे. त्यांच्या बदलीनंतर पुराणिक यांनी व्हाट्सअपला स्टेटस ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी पुराणिक यांच्या दादागिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे सोशल मीडियावर पुणेकरांनी पुराणिक यांच्यावर मोठा संताप व्यक्त केला होता. त्यावेळी राजेश पुराणिक हे सामाजिक सुरक्षा विभागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत होते. आता पुराणिक यांची बदली करण्यात आली आहे. राजेश पुराणिक यांना हटवून नवीन अधिकाऱ्याला सामाजिक सुरक्षा विभागातील ही जबाबदारी देण्यात आलीय.
पुराणिक यांचा काही लोकांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या प्रकरणात एका महिलेने महिला आयोगामध्ये तक्रार दिली होती. याप्रकरणी महिला आयोगाने योग्य तो तपास करण्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
आज बदली झाल्यानंतर राजेश पुराणिक यांनी व्हाट्सअपला स्टेटस ठेवले. त्यामध्ये, "सर यहा कुछ ऑफिसर्स हे जो इमानदारी से अपनी ड्युटी करना चाहते है, लेकिन हमराही डिपार्टमेंट हमारी कोसने पर लगा हुवा है, गलत क्या है ये जानने से कोई फरक नही पडता, लेकिन गलत को सही करनेसे फर्क पडता है"
तसेच राजेश पुराणिक यांनी अभिनेता अजय देवगन यांचा सुप्रसिद्ध चित्रपट सिंघम मधील एका दृश्याची लिंक देखील त्यांच्या व्हाट्सअप स्टेटस वर ठेवली आहे.