पुणे : लॉकडाऊनमुळे शहरातील पीएमपी व एसटीच्या बससेवेसह एसटी, रेल्वे आणि विमानसेवाही काही महिने ठप्प राहिली. त्यामुळे पुण्याचा राज्यासह देशातील अन्य शहरांशी होणारा संपर्क तुटला. अनलॉकमध्ये अजूनही या सेवांचे रुतलेले चाक व्यवस्थितपणे मार्गावर आलेले नाही. सार्वजनिक वाहतूक ठप्प राहिल्याने सामान्य नागरिकांचे हाल झाले. केंद्र व राज्य शासनाने अन्य राज्यातील कामगारांसाठी विशेष रेल्वे व एसटी बसची व्यवस्था केल्याने काहीसा दिलासा मिळाला.
पीएमपी अधिक खिळखिळी
पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू होती. दि. ३ सप्टेंबर रोजी नियमित बस धावू लागल्या. पण कोरोनाच्या भीतीने बसचा वापर कमी होत आहे. मागील चार महिन्यांत प्रवासी संख्या केवळ पाच लाखांवर पोहचली आहे. लॉकडाऊनपुर्वीच्या तुलनेत प्रवासी व उत्पन्नाबाबत हा आकडा ५० टक्के एवढाच आहे. सध्या मार्गावर सुमारे १३०० बस धावत असून उत्पन्न वाढीसाठी अटल योजनेसह विविध उपक्रम राबविले जात आहेत. पण आधीच तोट्यात धावत असलेल्या पीएमपीला यंदा अभूतपुर्व तोटा सहन करावा लागत असल्याने आर्थिक स्थिती आणखी डळमळीत झाली आहे.
----------
रेल्वे अजूनही यार्डातच
लॉकडाऊन काळात केवळ मालवाहतुक सुरू राहीली. पण प्रवासी सेवा अजूनही ‘विशेष’ या नावाखालीच सुरू आहे. टप्प्याटप्याने या गाड्यांमध्ये वाढ केली जात आहे. त्यातही लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी आरक्षण बंधनकारक आहे. पुणे-मुंबईदरम्यान केवळ डेक्कन क्वीन व इंद्रायणी एक्सप्रेस या दोन इंटरसिटी गाड्या धावत आहेत. पुण्यातून लोणावळा, दौंड, बारामती, सातारा, पनवेल आदी मार्गावर धावणाऱ्या लोकल, पॅसेंजर सेवा अजूनही सुरू नाहीत. याचा सर्वसामान्य प्रवाशांचा फटका बसत आहे. खासगी वाहनांचा वापर करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
------------
बारा तास विमानतळ बंद
लॉकडाऊनपुर्वी पुणे विमानतळावरून दररोज सुमारे १७० विमानांची ये-जा होत होती. विविध निर्बंधांमुळे लॉकडाऊननंतर हा आकडा निम्म्याहून कमी झाला. त्यातच २६ ऑक्टोबरपासून पुढील वर्षभर दुरूस्तीच्या कामासाठी रात्री ८ ते सकाळी ८ यावेळेत धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विमान उड्डाणांवर मर्यादा आल्या आहे. लॉकडाऊन पुर्वीच्या तुलनेत सध्या निम्मी उड्डाणे व प्रवासी नाहीत. सध्या दररोज केवळ ८ ते ९ हजार प्रवासी ये-जा करतात. ही स्थिती पुढील वर्षीही कायम राहण्याची शक्यता आहे.
------------
एसटीला प्रवाशांची प्रतिक्षा
लॉकडाऊन काळात परराज्यातील नागरिकांना राज्याच्या सिमेपर्यंत पोहचविण्यात महत्वाचा वाटा एसटीने उचलला. नियमित बससेवा सुरू झाल्यानंतर मात्र प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविली. बहुतेक गाड्या रिकाम्या धावत होत्या. बहुतेक मार्गांवर बस धावत असल्या तरी अजून प्रवाशांची प्रतिक्षा आहे. उत्पन्नवाढीसाठी माल वाहतुक सुरू केली तरी तितकासा प्रतिसाद नाही. आता पुण्यातून रायगड, महाबळेश्वर, लोणावळा, गाणगापुर दर्शन पर्यटन सेवा सुरू केल्या जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.