बारामती : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विटी दांडु खेळण्याचा आनंद लुटला. पवार यांच्या राजकीय सभा त्यांच्या भाषणातील फटककेबाजीमुळे गाजतात. आज देखील पवार यांनी बारामती शहरातील शारदा प्रांगणामध्ये विटी दांडुच्या खेळाची फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विटी दांडु खेळताना ६ वेळा त्यांचा नेम चुकला. आज बारामती परिसरात पवारांचा विटी दांडुचा खेळ चर्चेचा विषय ठरला होता.
आपल्या संस्कृतीत अनेक खेळ आहेत. मात्र, बदलती जीवन शैली आणि यंत्राच्या युगात खेळ लोप पावत चालले आहेत. हे खेळ आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहेत. आपल्या पैकी कित्येक जण हे खेळत मोठे झाले. मात्र, आपल्या पुढच्या पिढीला हे खेळ माहीत देखील नाहीत. या पार्श्वभूमीवर ३ ते ५ जून दरम्यान एन्व्हॉर्यमेंटल फोरम आॅफ इंडियाच्या अध्यक्षा आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून पर्यावरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी आज मातीतील खेळांच्या जत्रेची सुरुवात रविवारी (दि. ३) सकाळी झाली. यामध्ये विटी दांडु, गोट्या, लगोरी, टायर पळविणे, भोवरा, रस्सीखेच अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील बालपणीच्या खेळांचा आनंद लुटण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीही अनेक वर्षांनंतर विटी दांडू हाती घेत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पवार यांचा विटी दांडुचा खेळ पाहताना बारामतीकर भारावले होते.
यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासह अभिनेत्री अमृता सुभाष, दिग्दर्शिका आश्वीनी दरेकर तसेच, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, शुभांगी पवार, सुप्रिया पाटील, पंचायत समितीचे सभापती संजय भोसेले, फेरेरोचे कार्यकारी संचालक इंदरकुमार चोप्रा, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तीयाज शिकीलकर यांनी खेळाचा आनंद लुटला. अनेक मुलांचे पालक खेळामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचे प्रमाण उल्लेखनीय होते. ‘मी जिंकणारच’या इर्षेने महिलांची उत्साहात सहभाग घेतल्याचे चित्र होते. तर पुरुषांची देखील खेळात सहभागी होताना चांगलीच दमछाक झाली. शहरातील शारदा प्रांगणाला त्यामुळे उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले होते.त्यासाठी बारामतीकरांनी पहाटे ६ वाजल्यापासुनच गर्दी केली होती. यावेळी पार पडलेल्या सामूहिक नृत्यामध्ये अनेकजण मनमुराद नाचले. पर्यावरण महोत्सवादरम्या सोमवारी (दि. ४ जुन) ला सकाळी सात वाजता बारामती कन्हेरी रस्त्यावर वृक्षारोपण महोत्सवाचे आयोजन केले आहे. या वृक्षारोपन महोत्सवात पाचशेहून अधिक झाडे श्रमदानातून लावली जाणार आहेत. त्यानंतर पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी मंगळवारी (दि. ५) सकाळी सहा वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.