राज्यातील ऐतिहासिक कारागृहांची माहिती सर्वसामान्य जनतेला मिळावी यासाठी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आजपासून "तुरुंग पर्यटनाला" सुरूवात करण्यात आली. पुण्यातील येरवडा कारागृहामधून या पर्यटनाला सुरुवात होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या तुरुंग पर्यटनाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी येरवडा तुरुंगात असताना त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राचं वाचन अजित पवार यांनी यावेळी केलं आणि बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या. बाळासाहेब ठाकरेंनी लिहिलेल्या पत्राचा दाखला देत अजित पवार यांनी येरवडा कारागृहाच्या ऐतिहासिकतेचं महत्वं उपस्थितांना सांगितलं.
"येरवडा कारागृहाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. जेल पर्यटन ही कल्पनाच वेगळी आहे. पण या उपक्रमाबद्दल कदाचित टीका होण्याची शक्यता आहे. जितक्या व्यक्ती तितकी वेगवेगळी मत असतात. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना म्हणजे या कारागृहाचे बांधकाम आहे. या कारागृहाला १५० वर्ष पूर्ण झालीत. त्यामुळे हा स्थापत्यकलेचाही उत्तम नमूना आहे. हे आताच्या पीढीला पाहता यायला हवं", असं अजित पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे या कार्यक्रमला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही येरवडा कारागृहाच्या आठवणी जाग्या केल्या. "जेलभरोनंतर आता आपण जेल पर्यटन सुरू करत आहोत. या गोष्टीचा मला आनंद आहे. शिवसेनाप्रमुखांना भेटायला मी देखील येरवडामध्ये यायचो. त्यावेळचं जेलचं वातावरण मला अजूनही आठवतंय. तुरुंग पर्यटनाच्या निमित्ताने आपल्या स्वातंत्र्य सेनानींच्या त्यागाची प्रचिती आपल्या नव्या पिढीला येईल", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
'जेल पर्यटन' म्हणजे नेमकं काय?राज्यातील कारागृहे स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. या घटनांचे संदर्भ कारागृह प्रशासनाकडून जतन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक घटनांमधून प्रेरणा मिळावी, यासाठी कारागृहांमध्ये ‘प्रिझन टुरिझम’ची संकल्पना राबविण्यात येत आहे. पुण्यातील येरवडा कारागृहापासून या पर्यटनाची सुरुवात आजपासून होत आहे. येरवडा, ठाणे, नाशिक कारागृहात स्वातंत्र्यलढ्यात अनेक घटना, प्रसंग घडले आहेत. राष्ट्रीय पुढाऱ्यांनी या कारागृहांमध्ये शिक्षा भोगली आहे. त्या अनुषंगाने संबंधित कोठड्यांचे जतन करण्यात आले आहे.