पुणे : भाजप- शिवसेना युतीची व्हिडीओच्या माध्यमातून राज ठाकरेंनी पाेलखाेल केली हाेती. राज ठाकरेंनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा घेत भाजपाला मतदान न करण्याचे आवाहन केले हाेते. त्यावेळी त्यांच्या प्रत्येक सभेत राज ठाकरे व्हिडीओ लावून युतीच्या याेजनांची, दाव्यांची पाेलखाेल करत हाेते. त्यांचा लाव रे ताे व्हिडीओ हा डायलाॅग भलताच फेमस झाला हाेता. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) वतीने नुकताच नवनिर्माण करंडक ही क्रिकेटची स्पर्धा आयाेजित केली हाेती. या स्पर्धेत संघांना देण्यात आलेल्या जर्सीवर राज ठाकरेंच्या फाेटाे खाली लाव रे ताे व्हिडीओ हा डायलाॅग लिहीण्यात आला हाेता. त्यामुळे पुणेकरांमध्ये या जर्सीची भलतीच चर्चा हाेती.
लाेकसभेच्या प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा घेतल्या. मनसेचा एकही उमेदवार रिंगणात नसला तरी भाजप शिवसेना सत्तेत येऊ नये म्हणून ठाकरे यांनी मतदारांना युतीला मतदान न करण्याचे आवाहन केले. ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक सभेत स्क्रिनवर भाजपाची पाेलखाेल करणारे व्हिडीओ दाखविले. ते ज्या पद्धतीने लाव रे व्हिडीओ हे वाक्य उच्चारत हाेते, ते वाक्य तरणाईमध्ये भलतेच फेमस झाले. तरुणांकडून या वाक्याचा वापर माेठ्याप्रमाणावर हाेत आहे. नुकताच पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून नवनिर्माण करंडक क्रिकेट स्पर्धा आयाेजित करण्यात आली हाेती. या स्पर्धेत राज्यातून 39 संघ सहभागी झाले हाेतेे. यावेळी प्रत्येक संघाला वेगवेगळ्या रंगाची जर्सी देण्यात आली हाेती. परंतु या प्रत्येक जर्सीवर राज ठाकरेंचा फाेटाे आणि त्या खाली लाव रे ताे व्हिडीओ असे वाक्य लिहीण्यात आले हाेते. अशा प्रकारे जर्सीवर राज ठाकरेंचा डायलाॅग आल्याने ही जर्सी चर्चेचा विषय ठरली हाेती.
याबाबत बाेलताना मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव म्हणाले, तरुण वर्ग हा राज ठाकरे यांचा मोठा चाहता आहे. राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने भाजप-शिवसेनेच्या फसव्या योजनांची चिरफाड केली आणि त्यासाठी पुरावा म्हणून व्हिडिओ दाखवले ही गोष्ट तरुणांना खूप आवडली. त्यामुळे तरुण खेळाडूंच्या मागणी वरूनच आम्ही अशा प्रकारच्या टी-शर्टची छपाई केली आहे.
दरम्यान या स्पर्धेत पुण्यातील स्वारगेट भागातील श्री इलेव्हन या संघाने विजय मिळवला. त्यांना चषक आणि 51 हजार रुपयांचे पारिताेषिक देण्यात आले.