रिजवान शेख / कुरकुंभऔद्योगिक वसाहतीत वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे कुरकुंभ एमआडीसीमधील कामगारांचा जीव धोक्यात आला आहे. मात्र, चार दुर्घटना घडूनही एमआयडीसी प्रशासन सुरक्षेच्या उपाययोजना अमलात आणण्यास उदासीन आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून कारखानदारी उभी करायची व त्याला चालवण्यासाठी लागणाऱ्या सुरक्षा उपायांना बगल द्यायची हा कुठला न्याय? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पात आतापर्यंत कित्येक कामगारांचा नाहक बळी गेला आहे. प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणामुळे या घटना वारंवार घडत आहेत. मात्र, एमआयडसीच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेकडे कानाडोळा केल्याचे वाढत्या दुर्घटनांमुळे पुढे येत आहे. रासायनिक प्रकल्प सुरू करताना कराव्या लागणाऱ्या चाचण्या या प्रत्यक्षात येऊन केल्या जातात की पुण्यातील आॅफिसमधूनच या प्रकल्पांना पूर्णत्वाचे दाखले मिळत आहेत, या बाबत सर्व प्रश्न सध्या अनुत्तरीतच आहेत. एखाद्या रासायनिक प्रकल्पाला आग लागली, की दुसऱ्या दिवशी सर्व शासकीय यंत्रणा जाग्या होऊन तपासण्या करण्यास सज्ज होतात. मात्र, या सर्व तपासण्यांचे अहवाल गुलदस्त्यातच राहतात व प्रकल्प पुन्हा सुरू होतो. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात झालेल्या एका अपघातात देखील काढण्यात आलेला निष्कर्ष पहावयास मिळत नाही. कंपनी निरीक्षक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी केव्हा येतात व केव्हा जातात याचा तपास आजपर्यंत कोणालाच लागला नाही. यदा कदाचित त्यांना भेटण्याचा प्रसंग आला तर हे अधिकारी दूर दूर पळत राहतात. त्यामुळे या सर्व दुर्घटनांमध्ये होणाऱ्या सरकारी निर्णयावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे . या आधी अल्कली आमइंस, इंटरनिस फाईन केमिकल्स, पटनी फोम्स या विविध कंपन्यांमध्ये झालेल्या स्फोटाने कुरकुंभला हादरून सोडले होते. त्यातच दत्ता हायड्रोकेममधील या घटनेने मालिका चालूच राहिली आहे. मात्र यावर उपाययोजना काय झाली, या बाबत कंपनी निरीक्षक व प्रदूषण मंडळाचे अधिकारी प्रतिक्रिया देण्याचे टाळत आहेत. त्यामुळे सगळाच कारभार अनागोंदी असल्याचे स्पष्ट होते. आमदार राहुल कुल यांनी इंटरनिस कंपनीतील स्फोटानंतर विधानसभेत प्रश्न उपस्थीत केला होता. मात्र त्याचेदेखील उत्तर कदाचित मिळाले नाही, असंच काहीसं वातावरण कुरकुंभ येथे आहे. आजपर्यंतच्या दुर्घटनांमध्ये कुठल्याच कामगार मंत्र्यांची भेट नाही. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात आजपर्यंत मोठ्या प्रमाणत दुर्घटना झाल्या कित्येक कामगारांचा बळी गेला; मात्र शासन, प्रशासनाने कधीच गंभीर दाखल घेतली नाही किंवा कुठल्याच मंत्र्यानेदेखील घेतलेली नाही. दत्ता हायड्रो कंपनीत सुरक्षासाधनांची वानवाकुरकुंभ : येथील औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या दत्ता हायड्रो केम हा प्रकल्प अत्यंत ज्वलनशील अशा पेंटेन या रसायनाच्या रासायनिक प्रक्रियेतून कार्बन हायड्रोजनसारखे घातक उत्पादन करीत आहे. हायड्रोजनसारख्या वायूच्या उत्पादनात वापरात लागणारी सुरक्षा उपकरणे ही मोठ्या प्रमाणात असणे गरजेचे आहे. मात्र, अशा कुठल्याही व्यवस्था या ठिकाणी नसल्याने येथील कामगारांचा जीव कायमच धोक्यात आहे. बुधवारी झालेल्या दुर्घटनेवरून कारखाना प्रशासनाची बेफिकीरी समोर आली आहे. हायड्रोजन हा वायू हवेच्या दिशेने पसरत जाऊन आग पसरवण्याचे काम करतो. त्याला नियंत्रित करण्यासाठी फोम असणाऱ्या अग्निशामकाची गरज पडते. मात्र ही उपकरणे या ठिकाणी फक्त नावालाच प्रथम दर्शनी दिसत आहेत. ज्या स्वरूपातील व ज्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते त्या प्रमाणात अगदी शून्य सुरक्षा आढळून येत आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत सामान्य कामगार वर्ग भरडला जात आहे. बुधवारी झालेल्या दुर्घटनेतील जखमींची परिस्थिती सध्या सामान्य असल्याचे समजते. या दुर्घटनेत ते जवळपास २५ टक्के भाजले असून पुणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री स्फोट झाल्यावर उडालेल्या गोंधळात किती जण जखमी झाले हे देखील येथील व्यवस्थापनाला माहित नव्हते. या मधील एक कामगार प्रवीण बोबडे (वय ३५, रा. पाटस) हा देखील किरकोळ जखमी झाला होता. (वार्ताहर)कुठलीच नियमावली पाळत नाहीकुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पांमधील बरेसचे कारखाने हे सुरक्षेच्या बाबतीत खर्च करण्यास टाळाटाळ करीत असतात. सुरक्षासाधने, सुरक्षा अधिकारी नेमणे, तसेच सुरक्षासंबंधी विविध योजना राबविणे या संदर्भात कुठलीच नियमावली पाळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे वारंवार अशा घटना घडून कामगार व त्यांच्या कुटुंबांतील व्यक्ती भरडली जात आहे. दखल घ्या : अन्यथा जनचळवळ उभी होणार?दरम्यान दत्ता हायड्रो केमला लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कुरकुंभमधील तरुणांनी या सर्व बाबतीत चिंता व्यक्त करून या सर्व दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यवस्थापनाला चाप कधी बसणार, हा प्रश्न उपस्थित केला. याबाबत स्थानिक नेतृत्वाकडून होणारी डोळेझाकदेखील त्यांनी समोर आणली. त्यामुळे येणाऱ्या काळात औद्योगिक क्षेत्रांमधील कारखानदारांना सुरक्षेच्या बाबतीत गंभीर दाखल घ्यावी लागेल अन्यथा या सर्व प्रकारांतून एक जनचळवळ उभी राहू शकते.
कुरकुंभच्या दुर्घटना थांबणार तरी कधी?
By admin | Published: March 31, 2017 2:17 AM