पुणे : स्वच्छ पुणे सुंदर पुणे अशी पुणे महानगरपालिकेचे घाेषवाक्य आहे. पुण्याला स्वच्छ ठेवण्यात महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच स्वच्छ सर्वेक्षण नुकताच पार पडले. यात पुण्याला स्वच्छतेत पहिला नंबर कसा मिळेल याकडे महापालिकेने विशेष लक्ष दिले. त्यासाठी विविध याेजना देखील राबविल्या. आज सकाळी गाडीवरुन जाताना रस्त्यावर थुंकणाऱ्या दुचाकी चालकाला पुण्याचे उपमहापाैर सिद्धार्थ धेंडे यांनी चांगलाच धडा शिकवला. थुंकणाऱ्या तरुणाला थांबवत त्याच्याकडून त्यांनी रस्ता धुवून घेतला. तसेच पुन्हा रस्त्यावर न थुंकण्याची तंबी देखील दिली. पुण्याचे उपमहापाैर स्वच्छतेबाबत इतके सजग असल्याचे पाहत नागरिकांनी त्यांचे काैतुक केले, तसेच आभार देखील मानले.
आज सकाळी नेहमीप्रमाणे सिद्धार्थ धेंडे हे आपल्या प्रभाक क्रमांक दाेनमध्ये स्वच्छतेची व इतर पाहणी करत हाेते. त्यांच्या प्रभागामध्ये लुंबिनी थिम पार्क आहे. या पार्कजवळ एक तरुण दुचाकीवरुन जात असताना हेल्मेट घातलेले असताना देखील ते वर करुन रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकला. हे तेथून जाणाऱ्या धेंडे यांनी पाहिले. त्यांनी तात्काळ त्या तरुणाला थांबवले. त्याने केलेल्या चुकीच्या कृत्याची त्यांनी त्याला जाणीव करुन दिली. तसेच जवळील एका दुकानातून पाणी घेऊन रस्ता स्वच्छ करण्यास त्या तरुणाला सांगितले. स्वच्छ केल्यानंतरच त्याला जाऊ दिले. तसेच पुन्हा रस्त्यावर न थुंकण्याची तंबी देखील दिली. खुद्ध उपमहापाैरांनी कान उपटल्याने त्या तरुणाने सुद्धा रस्त्यावर न थुंकण्याची हमी दिली.
दरम्यान, या भागात राेज सकाळी अनेक ज्येष्ठ नागरिक फिरण्यास येत असतात. असे प्रकार दरराेज घडत असतात, परंतु लाेक त्यांचे ऐकत नाहीत. त्यांनी धेंडे यांचे आभार मानले तसेच त्यांच्या कृतीने त्यांना बरे वाटल्याचेही आवर्जुन सांगितले. लाेकमतशी बाेलताना धेंडे म्हणाले, राेज सकाळी मी माझ्या प्रभागामध्ये स्वच्छतेचा आढावा घेत असताे. आज सकाळी एक तरुण दुचाकीवरुन जाताना रस्त्यावरच थुंकला. त्याला अडवून जाब विचारत त्याच्याकडून रस्ता धुवून घेतला. पुणे शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचबराेबर रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर देखील कारवाई सुरुच आहे.