चाकण : येथील एका महिलेवर मंगळवारी सहा फेब्रुवारीला खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून, एक आठवडा होऊनही पोलिसांनी तिला अद्याप अटक केलेली नाही, त्या महिलेला त्वरित अटक करण्याची मागणी चाकण व परिसरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तिने आतापर्यंत दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांची वरिष्ठांमार्फत सखोल चौकशी करून तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तिला अटक केली नाही, तर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.या महिलेने समाजसेवेच्या व महिलांना न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांना ब्लॅकमेल करून आर्थिक तडजोडीचे प्रकार केले असून या कारणामुळे तिला मानवाधिकार संघटनेतून काढून टाकण्यात आले असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. आतापर्यंत चार-पाच विनयभंगाच्या तक्रारी दिल्यावरून खोट्या तक्रारी दाखल केल्याबद्दल पीडित तरुणांनी आपल्या व्यथा मांडल्या असून अनेकांवर ‘एनसी’ च्याही अनेक आहेत.अनेक तक्रारी पोलीस ठाण्यापर्यंत न येता परस्पर आर्थिक तडजोडी करून मिटविण्यात आल्या असून या महिलेवर न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचे पीडित तरुण कुशल जाधव व संतोष गोरे यांनी सांगितले. या महिलेबाबत अनेकांच्या तक्रारी असून पोलिसांनी सर्वसामान्य व्यक्ती, व्यावसायिक व उद्योजकांना द्यावा अशी मागणी करण्यात आली. चाकण पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी सुरू केली आहे.
‘त्या’ खंडणीखोर महिलेला अटक केव्हा ?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 9:31 PM