नसरापूर : आजपर्यंत तुम्ही वस्तू , गाडी , दागिने, पैसे असे सगळे प्रकाराची चोरी झाल्याची घटना आपल्या ऐकिवात असू शकते. परंतु एखाद्याचे कसणारे शेत चोरीला जाण्याची घटना तशी दुर्मिळच. आणि ती चोरी सुध्दा दुसरे तिसरे कोणी नाही खुद्द लघु पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्याकडून केली जाते हे अधिक आश्चर्यकारक म्हणावे लागेल. पण खरोखर अशी घटना घडली आहे. औषधोपचारासाठी पुण्याला मुलाकडे आलेल्या एक शेतकरी जेव्हा गावाला परततो. तेव्हा त्याला कसणाऱ्या जमिनीत फक्त खडकाळ मुरुम आढळतो. कितीतरी वर्ष ज्या शेतातून भरघोस पिके काढण्यात आली. आपल्या शेताची झालेली अशी अवस्था पाहून शेतकऱ्याच्या मनात जणूकाही आपले शेतच चोरीला गेले असल्याची भावना डोकावून गेली. हा प्रकार घडला भोर तालुक्यातील जांभळी येथील शेतकरी सर्जेराव विठ्ठ्ल कोळपे (वय ६७)यांच्यासोबत घडला. त्यांनी माती लघु बंधारा विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल केली आहे. नसरापूरपासून जांभळी येथील कोळपे यांचे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. त्यातील गट क्रमांक २२३ मधील १९ गुंठे क्षेत्र हे शेतीसाठी उपयोगात आहे. आजारपणामुळे ते गेले काहीदिवस आपल्या मुलाकडे पुणे येथे औषधोपचारासाठी गेले होते.गावच्या यात्रेकरीता कोळपे गावाला आले. त्यावेळी ते आपल्या शेतात गेले असताना आपली शेतजमीन नाहीशी झाली की काय असे दिसुन आले. यावेळी त्यांच्या शेतात ४ फुट खोल विनापरवाना (उत्खनन) खोदाई करून सर्व माती चोरुन नेण्यात आल्याचे चित्र दिसले. त्यामुळे शेतात माती न राहता केवळ मुरूम उरला आहे. कोळपे यांच्या शेतजमिनीतील जागेतून महसुल विभागाच्या पंचनाम्यानुसार अंदाजे ४ फुट खोल,३२ फुट रुंद व ४५० फुट लांब दक्षिणोत्तर उत्खनन करून सुमारे ५७६ ब्रास मातीची शेतकऱ्याच्या कोणत्याही परवानगीशिवाय वाहतूक करण्यात आली असल्याचे पंचनाम्यात नमुद करण्यात आले आहे. शेतातील माती पंचायत समिती भोर अंतर्गत लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोळपे यांच्या परवानगीविना बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी कोळपे यांच्या शेतातील माती नेली असल्याचे समजले.शेतातील माती खरडून नेल्यामुळे सुपीक जमीन मुरबाड झाली असल्याचे सांगत महसुल विभागाकडून त्या जमिनीच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. सदर घटनेबद्दल तक्रार दिल्यावर चोरी गेलेल्या संबंधितावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही.