विवेक भुसे-पुणे : कर्तव्याप्रति समर्पणाची भावना असेल, तर साधा कॉन्स्टेबलही वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा अधिक चांगले काम करू शकतो. अनुभवातून आलेले शहाणपण अनेकदा डिग्रीतून मिळतेच असे नाही. याची प्रचिती सहकारनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस नाईक मीनाक्षी महाडिक यांनी शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजना; तसेच गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासंदर्भात मीनाक्षी महाडिक यांनी टीआरएम (साप्ताहिक पोलीस बैठक) मध्ये सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धडे दिले. या बैठकीला पुण्याचे पोलिस आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्यासह शहरातले अनेक वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलीस खात्यात केवळ वरिष्ठांनी आदेश द्यायचा व त्याप्रमाणे कनिष्ठांनी त्याची कार्यवाही करायची, अशी पूर्वांपार पद्धत अवलंबिली जाते. मात्र, या मंगळवारची टीआरएम वेगळी ठरली. मीनाक्षी महाडिक या गेली १७ वर्षे शहर पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सुरुवातीला वाहतूक शाखेत काम केले़ त्यांच्या कामाची पद्धत व टापटीपपणा म्हणून त्यांची तब्बल १० वर्षे बदली केली गेली नाही. सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये २८ ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांची सर्व्हेलन्स विभागात बदली करण्यात आली. सर्व्हेलन्स विभागात काम करणाऱ्या या एकट्या महिला कर्मचारी आहेत़ सहकारनगर पोलीस ठाण्यात गेल्या. तीन वर्षांपासून काम करीत असताना त्यांनी १४ एमपीडीए केसेस केल्या. त्यापैकी १२ यशस्वीपणे लागू झाल्या. ४२ जणांना तडीपार केसेस तयार केल्या. दरवर्षी २०० ते २५० जणांवर प्रतिबंधक कारवाया त्यांच्याकडून केल्या जातात. त्यांचे हे काम पाहून पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासंदर्भात कसे काम केले पाहिजे, हे सर्वांना माहिती व्हावे, यासाठी त्यांचे व्याख्यान ठेवण्याची कल्पना पोलीस आयुक्त डॉ़.के. व्यंकटेशम यांच्याजवळ बोलून दाखविली. त्यांनाही कल्पना आवडली आणि त्यांनी महाडिक यांचे व्याख्यान वरिष्ठांसाठी ठेवले.
....................
पदापेक्षा कर्तव्य श्रेष्ठमहिला पोलीस नाईक मीनाक्षी महाडिक या वरिष्ठ नसल्या, तरी कर्तव्याने श्रेष्ठ आहेत़ त्यांच्याकडून गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासंदर्भातील धडे सर्व अधिकाऱ्यांनी घेतले. कर्तव्याप्रति समर्पणाची त्यांची वृत्ती आम्हा सर्वांना नेहमीच प्रेरित करले़ डॉ. के . व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे.
......................‘‘अटक केलेल्या गुन्हेगारावर कसा वचक ठेवायचा, सध्या जे सक्रिय नाहीत किंवा ते सक्रिय असलेल्या जुन्या गुन्हेगारांना काय मदत करतात, अशा गुन्हेगारांवर कशी नजर ठेवू शकतो. भविष्यातील गुन्हेगार होऊ शकतील अशा मुलांवर पाळत ठेवून त्यांच्या पालकांना भेटून त्यांना गुन्हेगारीपासून कसे दूर ठेवता येईल. हे मी अनुभवातून शिकले. तेच वरीष्ठांसमोर बोलले़ गुन्हेगार अनेकदा वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करतात, त्यांचे रेकॉर्ड कसे अद्ययावत ठेवायचे़, हे सांगितले. सहकारनगर हे जुने पोलीस ठाणे आहे. त्यातून अनेक नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती झाली. तरीही हे जुने रेकॉर्ड कसे चांगले ठेवले, याची माहिती दिली. पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण यांच्याबरोबरीने हे काम मी करते़’’ -मीनाक्षी महाडिक .............
गुन्हेगारांची कुंडली तोंडपाठसहकारनगर पोलीस ठाण्याच्या भेटीदरम्यान मीनाक्षी महाडिक यांना त्यांच्या हद्दीतील सर्व गुन्हेगारांची कुंडली माहिती असल्याचे दिसून आले. त्यांना त्यांच्या विषयाची परिपूर्ण माहिती असल्याचे लक्षात आहे. त्यांनी हे ज्ञान प्रयत्नपूर्वक मिळविले आहे. बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी त्या स्वत: त्यांच्या पालकांना जाऊन भेटतात. पोलीस ठाण्याच्या सर्व मोहिमेत त्या सहभागी असतात. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त, पुणे
000