पुणे : लावणी म्हणजे सौंदर्य, नजाकत, ठेका धरायला लावणारी कला. लावणी म्हणजे लवण. लवण म्हणजे मीठ. आपल्या जेवणात मिठाचे जे महत्व आहे तेच आपल्या जगण्यात लावणीचे आहे. त्या लावणीच्या झटक्यात जगण्याची प्रेरणा मिळते....अशा शब्दात लावणीचे सौंदर्य आपल्या खास शैलीत उलगडत सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी या कलावंत मुलींचा योग्य तो सन्मान राखायला हवा, याकडे रसिकांचे लक्ष वेधले. ही लोककला जिवंत ठेवणारे कलावंत आयुष्यभर रसिकांचे मनोरंजन करत असतात. त्या कलावंतांच्या वृद्धापकाळी त्यांचे आयुष्य समाधानात व्यतित व्हावे यासाठी सरकारने त्यांच्या वृद्धापकाळची सोय करायला हवी,याबाबत सरकारचा काही योजनांचा विचार चालू आहे. आता त्या योजना प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही ते म्हणाले. पुणे नवरात्र महोत्सवातील लावणी महोत्सवाचे उदघाटन श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झाले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार उल्हास पवार, नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल मंचावर उपस्थित होते. सलग 12 तास चालणारा हा लावणी महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले आणि अभिनेत्री श्वेता शिंदे यांनी या लावणी महोत्सवाला भेट दिली. आठवले यांनी आपल्या शीघ्र कवितेने उपस्थितांची मने जिंकली . निवडणुकीच्या राजकारणात आपण वेगळे असतो पण,भारतीय म्हणून आपण एक आहोत त्यामुळे माझे या व्यासपीठावर येण्याचा वेगळा अर्थ काढू नये अशी मिश्किल टिप्पणी आठवले यांनी करताच सभागृहात हशा पिकला.लावणी महोत्सवाच्या उद्घाटनानंतर गण गौळणीने लावणीच्या सादरीकरणाला सुरूवात झाली. नंतर या रावजी बसा भाऊजी, बाई मी लाडाची कैरी पाडाची, मला आमदार झाल्यासारख वाटत गं, तुमच्या पुढ्यात कुटतेय मी ज्वानीचा मसाला, पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा अशा एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्या सादर करण्यात आल्या. बुगडी माझी सांडली गं, तुझ्या उसाला लागलं कोल्हा, आई मला नेसव शालू नवा या जून्या लावण्यांनी वेळी सा-या गणेश कला रंगमंच येथे टाळ्यांचा गगनभेदी कडकडाट झाला. लावणी महोत्सवातील महासंग्राम या कार्यक्रमात 'पाहुणं फक्त तुमच्यासाठी', 'लावणी धमाका', 'तुमच्यासाठी कायपण', 'छत्तीस नखरेवाली', 'ढोलकीच्या तालावर' या शीर्षकाखाली वेगवेगळ्या लावणी संस्थांनी ठसकेबाज लावण्या सादर केल्या या महोत्सवला प्रचंड गर्दी होती. महिलांचा सहभाग त्यात लक्षणीय होता.
.................
तुमच्या भागातील लोकांना वैचारिक दिशात्यामुळे तुम्ही आहात आमची आशा. आमच्या पँथरची असायची गावागावात छावणी त्यावेळी नेहमीच पाहायचो लावणी श्वेता शिंदे आहे आमची पाहुणी मग का नाही बघायची लावणी कलाकारांना उद्देशून ते म्हणाले तुमचा डान्स आत्ता सुरु आहे आमचा 2019 मध्ये सुरू होईल. अशा शाब्दिक फुलबाजीतून रामदास आठवले यांनी कवितेचा बार उडवला.