----------------
स्त्री’चा अपमान होता कामा नये
आपल्याकडे ज्या ’स्त्री’ भूमिका केल्या जातात त्या बहुतांशी विनोद निर्मितीसाठी केल्या जातात. पुरूषाने स्त्री ची भूमिका करताना त्याची जी त्रेधातिरपिट उडते. मग बऱ्याचदा त्या विनोदाची पातळी घसरते. पण मी जेव्हा ’स्त्री’ भूमिका केल्या. तेव्हा या गोष्टी कटाक्षाने टाळल्या. ‘‘सौभाग्यवती’ करताना मी स्त्री कशी असेल, स्त्रीत्वाचे मर्म काय असेल, तिचं स्त्रीत्व हे पुरूषांना जपता आलं पाहिजे. स्त्री’चे व्यक्तिमत्व भावविभोर आहे. तिच्या नजाकती दाखविता आल्या पाहिजेत. हा माझा अट्टहास होता. पण आपल्याकडे पुरूष कलाकारांनी स्त्री भूमिका करण्याकडे चांगल्या दृष्टीकोनातून पाहिले जात नाही. दिलीप प्रभावळकर यांनी स्त्री भूमिकेमधून शालीनता जपली होती. पण बाकीच्या भूमिका या बहुतांशवेळा टवाळखोरीकडेच झुकलेल्या वाटतात. ‘स्त्री भूमिका साकारणं हे पुरूषांसाठीच खूपच आव्हानात्मक असतं. स्त्री च्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करावा लागतो. त्यांची भूमिका साकारताना पुरूषांमध्ये मृदुपणा असावा लागतो. त्यांचे व्यक्तिमत्व आक्रमक नव्हे तर सौम्यचं असलं पाहिजे. त्यांचं दिसणं पण भूमिकेला पूरक असावं लागतं. तसं नसेल तर ते पात्र हिडीसपणाकडे झुकू शकते. स्त्री भूमिका साकारताना त्यांचा शारीरिक किंवा मानसिक पद्धतीने अपमान होणार नाही याचे भान ठेवावे लागते. हे सर्व सांभाळून स्त्री भूमिका पार पाडावी लागते, जे पुरूषांसाठी सोपं नाही.
- वैभव मांगले, अभिनेते
------------------
स्त्री भूमिका साकारताना साडीमध्ये वावरणं हेचं खूप मोठं आव्हान असतं. स्त्रियांना रोजच्या सवयीमुळे कदाचित त्याचं काही वाटत नसेल पण पुरूषांसाठी ही एक खडतर अशीच गोष्ट असते. ‘बालगंधर्व’ चित्रपटात ज्या दिवशी साडी परिधान करण्याचे शॉट्स असतील त्या त्या दिवशी दिवस दिवस मी उपाशी राहायचो. कारण वॉशरूमला जाण्याचा प्रश्न असायचा. साडी ही पूर्णत: शिवलेली असल्यामुळे जाणं शक्य व्हायचं नाही. त्यानंतर महिला साडी परिधान करून लोकलमध्ये कसा प्रवास करतात किंवा शेतात कसं काम करतात असा प्रश्न मला नेहमीच पडायचा. ‘बालगंधर्व’ यांची भूमिका साकारताना मी खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचा अनुभव घेतला. "स्त्री" ही आई, बहीण, बायको अशा विविध रूपांमध्ये समोर येते. कितीही संकटे आली तरी पुरूष डगमगतो, पण बाई खंबीरपणे कुटुंबाच्या मागे उभी असते. स्त्रीशक्तीला माझा खरंच सलाम आहे. स्त्री भूमिका करताना केवळ अभिनय करायचा नसतो तर जोपर्यंत तिच्या आत्म्यात तो शिरत नाही तोपर्यंत नुसतं साडी परिधान करून काही उपयोग नसतो. स्त्रीचा लाघवीपणा, ममत्व सर्व गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. तर साडी परिधान करायला अर्थ असतो. ‘बालगंधर्वांनी स्त्री ला त्या काळात सन्मान मिळवून दिला. गायक, अभिनेते म्हणून ते मोठे होतेचं, पण ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर देखील पडायची मुभा नव्हती त्या काळात त्यांनी स्त्री भूमिकांमधून स्त्रियांना सन्मान मिळवून दिला.
- सुबोध भावे, अभिनेता
------------------------------