पुणे : मी त्या वेळी कामात हाेताे. तेव्हा दुपारच्या वेळी माेबाईल वाजला, म्हणून ताे नेहमीप्रमाणे उचलला, तेव्हा पलीकडून हॅलाे, मी गृहमंत्री अनिल देशमुख बाेलताेय असे ऐकल्यावर क्षणभर मला शाॅकच बसला. थेट गृहमंत्री आपल्याला कशाला फाेन करतील अशी शंका आली. त्यांनी पुन्हा आपले नाव सांगितले व तुम्ही काेथरुड पाेलीस ठाण्यात गेला हाेता. असे त्यांनी सांगितल्यावर माझा विश्वास बसला, असे दिलीप पवार यांनी सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पुणे पाेलीस आयुक्तालयाला भेट देऊन पुणे शहर पाेलीस दलाच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. आयुक्तालयातील सेवा उपक्रमांतर्गत पाेलीस ठाण्यात भेट देणाऱ्या नागरिकांना फाेन करुन ते ज्या कामासाठी पाेलीस ठाण्यात आले हाेते, त्या कामाविषयी काय झाले. त्यांनी तक्रार जाणून घेतली का, तसेच त्यांना समाधानकाराक माहिती मिळाली का, हे जाणून घेतले जाते. सेवा प्रकल्प कार्यालयातून थेट तक्रारदाराला तेथील कर्मचारी फाेन करुन त्याची माहिती जाणून घेतात.
पाेलीस कर्मचारी ज्या पद्धतीने ही माहिती घेतात, तशाच पद्धतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काेथरुडमधील दिलीप पवार यांना फाेन केला. गृहमंत्री बाेलत असल्याचे ऐकून त्यांना शाॅकच बसला. त्यांनी आपली काेणतीही तक्रार तव्हती तर आपण चारित्र्य पडताळणीसाठीच्या कामासाठी पाेलीस ठाण्यात गेलाे हाेताे. तेथे काही वेळात काम झाले, असे त्यांनी गृहमंत्र्यांना सांगितले.