पुणे : संध्याकाळी रोजच्याप्रमाणे फिरवून आणल्यावर डॉ. लागू यांचे रूप मी अखेरच्यावेळी बघत असेन असं मला स्वप्नातही वाटले नव्हते, अशा शब्दांत लागू यांचे ड्रायव्हर बबन माझिरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
डॉ श्रीराम लागू यांचे मंगळवारी रात्री पुण्यात निधन झाले. संध्याकाळी प्रकृती बिघडल्यावर राहत्या घरातून त्यांना दीनानाथ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
याबाबत माझिरे यांनी लोकमत'शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, मागील 25 वर्षांपासून मी लागू यांच्या वाहनाचे सारस्थ्य करतो. दररोजप्रमाणे मी त्यांना गाडीतून फिरवून आणले. त्यावेळी त्यांना काही त्रास होत नव्हता, मात्र मागील काही वर्षांपासून प्रकृतीत चढ -उतार सुरू होतेच. काम संपवून घरी गेल्यावर प्रकृती बिघडल्याचा दीपाताईंचा फोन आला. मी आलो आणि मला अशी दुर्दैवी घटना घडल्याचे समजले. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट दिवस असल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले.